आता तुम्हालाही जाता येणार येरवडा कारागृहात.. - Prison tour begins at Yerawada Jail  Home Minister Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

आता तुम्हालाही जाता येणार येरवडा कारागृहात..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

येरवडा कारागृहात 'जेल पर्यटन'ची सुरूवात येत्या २६ जानेवारी रोजी होत आहे.

नागपूर : पुण्यातील येरवडा कारागृहात 'जेल पर्यटन'ची सुरूवात येत्या २६ जानेवारी रोजी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्धाटन होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  

 ५०० एकरावर हे कारागृह आहे. शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी यांना हे कारागृह पाहण्यासाठी जाता येणार आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. स्वातंत्र्य सैनिकांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होती. अजमल कसाब आणि चाफेकर बंधूच्या प्रकरणात आरोपींना याच कारागृहात फाशी देण्यात आली होती. राज्यात ४५ ठिकाणी ६० जेल आहेत. आज त्यामध्ये २४ हजार कैदी आहेत. कोरोनाच्या काळात १०५०० कैदी पॅरोलवर सोडले होते. ३००० कैदी शाळा व महाविद्यालयांमध्ये ठेवलेले आहेत.

पहिल्या टप्पात २६ जानेवारीला कारागृह पर्यटनाची सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात इतर शहरांमध्ये असे पर्यटन सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे देशमुख म्हणाले. पुणे करार येरवडा जेलमध्ये आंब्याच्या झाडाखाली झाला होता. ज्या सेलमध्ये मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु ज्या सेलमध्ये राहिले त्या जागांवर लोकांना भेटी देता येतील. शाळेच्या मुलांसाठी ५ रुपये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १० रुपये, तर सामान्य नागरीक आणि अभ्यासकांसाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. १५० वर्षांपूर्वीचे हे कारागृह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातून तर मी गोंदीया येथून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले. विद्यार्थी, जनतेकडून या उपमक्रमाला प्रतिसाद मिळेल, अशी आशा देशमुख यांनी व्यक्त केली.   

धनंजय मुंढे प्रकरण संपले आहे. रेणुका शर्मा यांनी अॅफिडेव्हीड करुन दिले आहे. त्यामुळे आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. या प्रकरणात विरोधकांनी राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही. पुलवामा हल्ला झाला १४ फेब्रुवारी २०१९ ला आणि बालाकोट हल्ला २६ फेब्रुवारीला झाला. अर्णब गोस्वामी यांना ही बातमी २३ फेब्रुवारीला कशी माहिती पडली. ५०० पानाचे चॅट बाहेर आले तेव्हा बार अध्यक्ष दासगुप्ता यांच्यासोबत अर्णब गोस्वामीच्या झालेल्या या चॅटमधून  धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. पार्थ दासगुप्ता यांच्यासोबत अर्णबने ही चर्चा कशी केली. नियोजनाची माहिती पंतप्रधान, संरक्षणमंत्री, सेनेचे उच्चाधिकारी यांनाच असते. त्यामुळे तीन दिवस आधी हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामीला मिळणे, ही गंभीर बाब आहे. 

राष्ट्रीय सुरक्षेचा हा प्रश्न आहे. राज्याचा गृहमंत्री म्हणून केंद्रातील नेत्यांना प्रश्न विचारणार आहे, असे गृहमंत्री म्हणाले. आता भाजपच्या नेत्यांना जाब विचारणार आहोत. कारण मागे अर्णब गोस्वामीला अटक केली होती, तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे आता त्यांनी या चॅटच्या संदर्भात उत्तर द्यावे. नागपूर जेलमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या एका जेल कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. राज्यातल्या कोणत्याही जेलमध्ये असे प्रकार होत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. 

Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख