सरकारकडे कोणताच ठोस प्लॅन नाही..आंबेडकरांची टीका - Prakash Ambedkar criticize central and state government Elgar Parishad | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारकडे कोणताच ठोस प्लॅन नाही..आंबेडकरांची टीका

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

कोणते निर्णय घ्यायला पाहिजे, हे सरकार ठरवतच नाही. जनतेने सांगितल्यावर सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे.

पुणे : राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा ठोस प्लॅन नाही, असा प्लॅन असता तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून आपण बाहेर पडलो असतो. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काहीच प्लॅन नाही. कोणते निर्णय घ्यायला पाहिजे, हे सरकार ठरवतच नाही. जनतेने सांगितल्यावर सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केली.

कोरेगाव भीमा येथे प्रकाश आंबेडकर यांनी आज विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, '' 1 जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचे आम्ही मानतो. जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत या दिवसाचे महत्व कायम राहील,''  

एल्गार परिषदेबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की याबाबत आमचे आणि न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे जे उद्दिष्ट होते, ते पूर्ण झाले आहे. एल्गार परिषदेसंदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आयोजक ठरवतील. कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात आज बोलणं योग्य ठरणार नाही.

कोरोनानंतर फार मोठा बदल होईल, असे मला वाटत नाही. मुंबई किंवा पुण्यातील लोकल आतापर्यंत सुरु व्हायला हवी होती. सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही असे दिसत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना घऱातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केले.

नव्या वर्षात राज्य सरकारला सद्बुद्धी मिळो : देवेंद्र फडणवीस
अमरावती : नव्या वर्षात राज्य सरकारला चांगली कामं करण्याची सद्बुद्धी मिळो, हीच अपेक्षा असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या शहीद सैनिक आणि शेतकऱ्यांना मदत निधी वाटपाच्या कार्यक्रमानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. नव्या वर्षाचा आपला कुठलाही संकल्प नसून येणाऱ्या वर्षात राज्यावरची आणि देशावरची संकटं दूर व्हावी, हे वर्ष शेतकऱ्यांना सुख समाधानाचं जावो आणि चांगली कामं करण्यासाठी राज्य सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. उद्या एक जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेन्द्र फडणवीस पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत. त्याबाबत विचारले असता माध्यमांनी संकुचित बुद्धीने विचार करणे सोडावं अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख