प्रदीप कंद पुन्हा घड्याळ बांधण्याच्या तयारीत ?  - Politics Pradip Kanda is on the path of NCP again | Politics Marathi News - Sarkarnama

प्रदीप कंद पुन्हा घड्याळ बांधण्याच्या तयारीत ? 

भरत पचंगे 
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

"प्रदीप कंद राष्ट्रवादीच्या वाटेवर" अशी चर्चा सध्या शिरुर-हवेली मतदार संघात  व्हायरल होत आहे.

शिक्रापूर : "प्रदीप कंद राष्ट्रवादीच्या वाटेवर" अशी चर्चा सध्या शिरुर-हवेली मतदार संघात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सध्या भाजपमध्ये असलेले प्रदीप कंद यांनी मात्र याबाबत मौन पाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका तगड्या माजी आमदाराने कंद यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशासाठी थेट मोठ्या साहेबांनाच गळ घातली आहे.  

सन २०१४ मध्ये विधानसभेसाठी तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसह लोकसभेसाठी कंद इच्छुक होते. विधानसभा, लोकसभा निवडणुक लढण्यासाठी पूर्ण क्षमता असताना कंदांना विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरता आले नाही. अशोक पवार यांनी पक्ष संघटनेवरील आपली पकड कधीच ढिली होवू दिली नाही. पक्षांतर्गत विरोधकांनाही डोके वर काढू दिले नाही. जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल व प्रदीप कंद हे पवार यांचे दहा वर्षात पक्षांतर्गत विरोधक राहिले. 

कंद व बांदल पक्षात असताना सन २०१४ च्या निवडणुकीत अशोक पवार सुमारे १० हजारांनी पराभूत झाले तर यावेळी कंद-बांदल पक्षात नसताना मात्र ते तब्बल ४१ हजार ५०० मतांनी विजयी झाले. याच पार्श्वभूमीवर बांदल सध्या अनेक वैयक्तिक अडचणींतून मार्ग काढीत असताना कंदही भाजपामध्ये फार रमत आहेत, अशी स्थिती नाही. विधानसभा निवडणुका अजून ४ वर्षे पुढे आहेत. आपल्याला पुन्हा विधानसभा निवडणूकीला सामोरे जायचे झाल्यास सुरक्षीत पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच असल्याची भावना कंदांची असल्याचे त्यांनी काही समर्थक खाजगीत सांगतात. शिवाय आम्ही मुळचे राष्ट्रवादीचेच असल्याचे कंद समर्थकांमधील काहीजण छातीठोकपणेही सांगतात. याच पार्श्वभूमीवर आता कंद राष्ट्रवादीत येणे त्यांच्या समर्थकांसाठीही गरजेचे आहे. 

पिंपरी-चिंचवड परिसरातील एक माजी आमदार तर थेट मोठ्या साहेबांकडे कंदांच्या पक्षप्रवेशासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चाही भाजपा गोटातून होत आहे. कंदांच्या राष्ट्रवादीच्या दिशेने प्रवासाची सुरवात झाली आहे, असे म्हणण्यास बराच वाव आहे. मात्र पक्षाला काय वाटते या पेक्षा अशोक पवारांना काय वाटते हे सध्या राष्ट्रवादीच्या आणि कंदांच्या प्रवेशाबाबत महत्वाचे आहे. 
       
"सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे त्यावेळीचे उमेदवार अशोक पवार यांचा सुमारे १० हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी सन २०२० च्या निवडणूकीपूर्वी कंद भाजपात गेले आणि अशोक पवार तब्बल ४१ हजारांनी विजयी झाले. पर्यायाने कंद पक्षात नसतील तर पूर्वीचे १० हजार तोडून ४१ हजारांच्या विक्रमी मतांनी अशोक पवार विजयी होत असतील तर ज्यांनी एवढे मोठे मताधिक्य मिळवून दिले त्या प्रामाणिक पक्ष कार्यकर्त्यांना नाराज करुन कंदांना पक्षात घेणे पक्षाच्या दृष्टीने योग्य की, अयोग्य हे आता पक्ष ठरवेल. पण सद्यस्थितीत पक्षात आहे ते कट्टर कार्यकर्ते आम्ही दुखवू इच्छित नाही," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी हवेलीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर तसेच राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष योगेश शितोळे यांनी दिली.  

गेल्या आठ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रवक्ते विकास लवांडे यांच्या एका फेसबूक पोस्टसह कंदांच्या राष्ट्रवादी प्रवेशांची चर्चां शिरुर-हवेली मतदार संघात होत आहेत. मात्र, याबाबत कंदांची प्रतिक्रिया दिलेली नाही. 'सरकारनामा'ने कंद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख