पूजा चव्हाणची आत्महत्याच की .....? : पोलिस त्या `दोघांचे` पुन्हा जबाब घेणार - police says not closed pooja chavan death case as suicide | Politics Marathi News - Sarkarnama

पूजा चव्हाणची आत्महत्याच की .....? : पोलिस त्या `दोघांचे` पुन्हा जबाब घेणार

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाणच्या मृत्यूशी एका मंत्र्याचा संबंध जोडला जात असल्याने त्यावर खूप चर्चा सुरू आहे. 

पुणे : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूच्या कारणांचा तपास पोलिसांनी सुरू केला असून तिचा मृत्य म्हणजे आत्महत्याच आहे, असे नोंदविलेले नाही हे स्पष्ट करण्यात आले. तसेच तिच्या मृत्यूबाबत सोशल मिडियात व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिप पोलिसांनाही मिळाल्या आहेत. त्यातील बऱ्याच क्लिप या बंजारा बोलीत असल्याने त्याच्या भाषांतराचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पूजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने रविवारी (ता. आठ फेब्रुवारी) तिचा मृत्य झाला. महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील फ्लॅटमधअये पूजा हि तिचा भाऊ आणि भावाचा मित्र यांच्यासोबत राहत होती. मूळ परळी वैजनाथ येथील असलेली पूजा ही स्पोकन इंग्रजीच्या क्लाससाठी पुण्यात महिनाभरापूर्वी आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ती गॅलरीतून पडली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. तिचा भाऊ विलास चव्हाण व अरूण राठोड यांनी तिला तेव्हा तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या दाव्यानुसार तिच्या आईवडिलांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र ती काही गंभीर आजाराने त्रस्त असल्याने तिने उडी मारली असावी, असा पोलिसांना जबाब देण्यात आला. सुरवातीपासून तिची आत्महत्या म्हणून सर्वत्र चर्चा आहे. पण पोलिसांनी कायदेशीरदृष्ट्या आत्महत्या म्हणून शिक्कामोर्तब केलेले नाही आणि ते प्रकरण बंदही केलेले नाही. 

ही पण बातमी वाचा : तर मग मलाही आत्महत्या करावी लागेल, असे तो मंत्री का म्हणाला?

 

पोलिसांनी काही बाबी पुन्हा तपासून पाहण्यास सुरवात केलेली आहे. सोशल मिडियात फिरत असलेल्या आॅडिओ क्लिप आपल्याला मिळाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. यातील काही क्लिप या बंजारा बोलीत असल्याने त्यांच्या भाषांतराचे काम सुरू करण्यात आले आहे. या क्लिप फाॅरेन्सिक आॅडिटसाठी पाठवणार का, सध्या तरी त्यावर काही निर्णय घेतलेला नाही. त्या पाठवायची लगेच गरज नाही. 

या क्लिपमध्ये एक मंत्री आणि त्याचा कार्यकर्ता यांचे संभाषण असल्याचे बोलले जात आहे. पूजा चव्हाणचा मोबाईल ताब्यात घे, असे या संभाषणात कथित मंत्री त्या कार्यकर्त्याला सांगत असल्याचे ऐकू येत आहे.

हा मोबाईल हॅंडसेट पोलिसांना तपासात मिळाला का, अशी विचारणा लगड यांना केली असता तो सापडला होता. मात्र तिच्या घरच्यांकडे तो सुपूर्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आधी टिकटाॅकवर आणि नंतर फेसबुकवर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असलेल्या पूजाचा मोबाईल या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तो पोलिसांनी तिच्या घरच्यांकडे लगेच सुपूर्त केल्याने त्यातील `डाटा`चे पुढे काय होणार, याची शंका नाही का, याबाबत लगड म्हणाले की आम्ही संबंधितांना पुन्हा जबाबासाठी बोलवून घेणार आहोत. तेव्हा आणखी काही बाबी स्पष्ट होतील.

पूजाच्या सोबत खोलीत राहणाऱ्यांनी आधी दिलेल्या जबाबात तिने उत्तेजक द्रव्य पिल्याचा उल्लेख आहे. त्याअनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. त्यासाठीचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आणि संबंधितांचे पुन्हा जबाब घेतल्यानंतर आणखी स्पष्टता येऊ शकेल, असे लगड यांनी सांगितले.  पहिल्या मजल्यावरून पडून लगेच मृत्यू होऊ शकतो का या प्रश्नावर लगड म्हणाले की बाथरूममध्ये पडल्यानंतरही मृत्यू होऊ शकतो आणि दुसऱ्या मजल्यावरून पडलेला व्यक्तीही वाचू शकते. त्यामुळे याबाबत काही सांगता येत नाही. 

एका मंत्र्याशी या मृत्यूचा संबंध जोडला जात असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी या संबंधातील आॅडिओ क्लिप या पोलिस महासंचालकांकडेही दिल्या आहेत. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे की काय, असा संशय विरोधी पक्षनेते व्यक्त करत आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख