राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांचा स्वतःच्या गावातच दारुण पराभव

गेले काही दिवस आमदार पवार हे वडगाव रासाईतच तळ ठोकून होते.
NCP MLA Ashok Pawar's defeat in his own village
NCP MLA Ashok Pawar's defeat in his own village

शिरूर (जि. पुणे) : शिरूर-हवेलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार ॲड. अशोक पवार यांना वडगाव रासाई (ता. शिरूर) या स्वतःच्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. तब्बल २५ वर्षांची राज्यस्तरावरील दोस्ती वर्षभरापूर्वी संपुष्टात आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची वडगावात मात्र ऐनवेळी झालेली युती यशस्वी ठरली. गेली काही दिवस आमदार पवार यांनी गावात तळ ठोकूनही त्यांचा पॅनेलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने त्यांना दारुण पराभवाला सोमोरे जावे लागले. 
    
आमदार अशोक पवार व वडगाव रासाईचे माजी सरपंच उद्धव शेलार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री रासाईदेवी ग्रामविकास पॅनेलच्या विरोधात भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब खळदकर, शिवसेनेचे विभाग संघटक वीरेंद्र शेलार, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी सचिन शेलार यांनी एकत्र येत रासाईदेवी जनसंघर्ष पॅनेल उभा केला होता. मनसे व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही या पॅनेलला पाठिंबा असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात सर्व पक्ष एकवटल्याचे वडगाव रासाईतील चित्र होते. प्रत्यक्ष निवडणुकीतही कमालीची चुरस निर्माण झाल्याने व साहजिकच हे आमदारांचे गाव असल्याने येथील लढतीकडे व दैनंदीन घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. 
    
एकूण १५ जागांपैकी एका वॉर्डातून सोपान बर्डे हे बिनविरोध निवडून आल्याने १४ जागांसाठी अतिशय चुरशीने निवडणूक झाली. आमदार पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. गेले काही दिवस आमदार पवार हे वडगाव रासाईतच तळ ठोकून होते. तथापि, भाजप, शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी पद्धतशीर फिल्डिंग लावून नियोजनबद्ध प्रचार केला. घरोघरी पोचून प्रत्येक मतदाराशी व्यक्तीशः संपर्क साधण्यावर भर दिला. नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेत राष्ट्रवादीचे पारडे काहीसे जड असतानाही भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध प्रचार मोहिम राबवून 'हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले. 
    
मतमोजणी झाल्यानंतर भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या रासाईदेवी जनसंघर्ष पॅनेलने स्पष्ट बहुमत मिळवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले. आमदार पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री रासाईदेवी ग्रामविकास पॅनेलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाने आमदार पवार यांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीच्या गोटातही खळबळ उडाली. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत यश मिळवूनही आमदारांच्या गावातच पक्षाला पराभवाचा धक्का बसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात निराशा पसरली. 

वडगाव रासाई ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सदस्य पुढील प्रमाणे : प्रियांका ढवळे, मेघा शेलार, मनोज शेलार, वीरेंद्र शेलार, कौसल्या शेलार, सचिन कोळपे, आप्पासाहेब कोळपे, अलका चव्हाण, आशा मगर, जयराम खळदकर, रत्नाकर खळदकर, अनुराधा शेलार, अलका परभाने, शीतल ढवळे. 

शिरूर तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व मिळविले आहे,  ही अभिमानाची बाब आहे. तरुण वर्गाने निवडणुकीची सूत्रे हातात घेतल्याने अनेक गावांत परिवर्तन पाहायला मिळाले. वडगाव रासाई गावातील पराभव मान्य असून, तो निवडणुकीतील जय पराजयाचाच एक भाग आहे. ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या नवीन उमेदवारांचे अभिनंदन. ग्रामपंचायतींना भरीव निधी देऊन गावांना ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचा आपला विशेष प्रयत्न असणार आहे. 
 - अशोक पवार, आमदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com