संजय जगतापांच्या खेळीने राष्ट्रवादी नाराज; सुप्रिया सुळेंकडे केली तक्रार  - NCP angry over Sanjay Jagtap's political game; Complained to Supriya Sule | Politics Marathi News - Sarkarnama

संजय जगतापांच्या खेळीने राष्ट्रवादी नाराज; सुप्रिया सुळेंकडे केली तक्रार 

दत्ता जाधव 
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

त्याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर जाणवत आहे.

माळशिरस (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीत पुरंदर तालुक्‍यात एकमेकांविरोधात लढलेले शिवसेना व कॉंग्रेस हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात लढले. त्याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर जाणवत आहे. 

विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरंदर तालुक्‍यात एकत्र लढल्याने तालुक्‍यात संजय जगताप यांच्या रूपाने कॉंग्रेस पक्षाचा आमदार झाला. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित येऊन शिवसेनाविरोधात लढतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. तालुक्‍यात बऱ्याच ठिकाणी असे समीकरण बघायलादेखील मिळाले. मात्र, पिसर्वे, गुरोळी, दिवे, निरा यासारख्या काही ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले. यामध्ये दिव्यासारखा गावात तर कॉंग्रेसने भाजप नेत्यांबरोबर हातमिळवणी करत माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनेलचे पानिपत केले. 

ज्येष्ठ नेते विजय कोलते यांचे गाव असलेल्या पिसर्व्यात कॉंग्रेसच्या ताकदीचा वापर करत शिवसेनेने राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी मदत केली. नीरासारखी मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या गावात कॉंग्रेसने इतर सर्व समविचारी गटाबरोबरच राष्ट्रवादीच्याही काही लोकांना बरोबर घेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता चव्हाण यांना पराभूत करण्याबरोबरच त्यांच्या पॅनेलचाही दारुण पराभव केला. कॉंग्रेसने अशा काही ठिकाणी राष्ट्रवादीला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षातील स्थानिक गावपातळीवरील कार्यकर्त्यांबरोबर केलेल्या जुळवाजुळवीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज दिसत आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सासवड येथे सत्कार करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळींनी खासदार सुळे यांच्यासमोर कॉंग्रेसच्या या खेळीबद्दल नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान केल्याचे हेच आम्हाला फळ काय? असा सूरदेखील काही कार्यकर्त्यांमधून ऐकावयास मिळाला. 

राष्ट्रवादीला नाराज करायला नको होते 

राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून काही ठिकाणी इतरांशी केलेल्या आघाडीबाबत पिसर्वे, दिवे, गुरोळी या ठिकाणचे चित्र पाहता प्रत्यक्षात कॉंग्रेसपेक्षा इतरांनाच या आघाडीचा फायदा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अशी आघाडी करून कॉंग्रेसने मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला तालुक्‍यात नाराज करायला नको होते, असे कॉंग्रेसमधील एका जाणकार नेत्याने खासगीत मत व्यक्त केले. 
 

ग्रामपंचायतींच्या निवडणुका या स्थानिक समीकरणानुसार होत असतात. स्थानिक हेवेदावे व हितसंबंध यामध्ये पाहिले जात असल्याने वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळींनी या निवडणुकांपासून लांब राहणेच योग्य आहे. 
-माणिक झेंडे-पाटील 
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पुरंदर 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख