पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षीच्या परीक्षा नको; राज ठाकरेंचा शिवसेनेच्या सुरात सूर 

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षाची परीक्षा नको, अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील हीच भूमिका घेत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे मागणी केली आहे.
MNS Chief Raj Thackeray Demands Cancellation of University Exams
MNS Chief Raj Thackeray Demands Cancellation of University Exams

पुणे : पदवी अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षाची परीक्षा नको, अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील हीच भूमिका घेत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे मागणी केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी या संबंधीचे पत्र राज्यपालांना पाठविले आहे. परीक्षेबाबत लवकर निर्णय घ्या, अशी सूचना करणारे पत्र दोनच दिवसांपूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठाविले होते. या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी पत्र दिले आहे.

सध्याची कोरोनाची मुंबई आणि महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता परीक्षा केंद्रांपर्यंत जाणे विद्यार्थ्यांना शक्य नाही. कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. या काळात परीक्षांचा घाट घालणे योग्य होणार नाही, असे ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) मार्गदर्शन मागणारे पत्र लिहिले होते. त्या पत्रात परीक्षा रद्द करण्याची थेट मागणी नसली तरी ‘यूजीसी’कडून राज्य सरकारला परीक्षा रद्द करणे अपेक्षित होते. 

परिक्षा घ्यावी असे अभ्यासकांचे मत 

या पत्रानंतर शिक्षण क्षेत्रातील काही अभ्यासकांनी परीक्षा घेणे आवश्‍यक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे राज्यपाल व राज्यातील विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अंतीम वर्षाच्या परीक्षांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची सूचना केली होती. या साऱ्या घडामोडींच्या पाश्‍र्वभूमीवर राज ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना मुंबईसारख्या ठिकाणी परीक्षांचे नियोजन करणे महाविद्यालयांसाठी अडचणीचे ठरणार असून त्यातून साथीचा फैलाव होण्याची शक्यता असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंचा दबाव?

शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या विद्यार्थी सेनेने सुरवातीला ही मागणी केल्यानंतर राज्य सरकारच्यावतीने मंत्री उदय सामंत यांनी ‘यूजीसी’ला पत्र लिहिले. सावंत यांनी केवळ अदित्य ठाकरे यांच्या दबावाखाली हे पत्र ‘यूजीसी’ला पाठविल्याची चर्चा यामुळे सुरू झाली. विशेष म्हणजे राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असलेल्या कोश्‍यारी यांच्याकडे मागणी न करता या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाकडे धाव घेतली. त्यामुळे कुलपतींनी परीक्षा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांना कुलपतींकडे खुलासा करावा लागला.अंतीम वर्षाच्या परीक्षेच्या निमित्ताने कुलपतींकडे पत्रे आणि खुलाशांचे राजकारण सुरू असताना या विषयात कोणत्याही राजकीय संदर्भाने पाहू नये. केवळ विद्यार्थी हीत समोर ठेऊन निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com