रोहितदादा, तुम्ही साहेबांचे लाडके आमच्या मागण्या तेवढ्या त्यांना सांगा 

त्यांचा हट्ट शरद पवार मान्य करतात; म्हणून मी त्यांच्याकडे मागणी करतो आहे.
MLA Dilip Mohite calls on Rohit Pawar to accept pending demands
MLA Dilip Mohite calls on Rohit Pawar to accept pending demands

चाकण (जि. पुणे) : "रोहितदादा, तुम्ही आमच्या मागण्याकडे लक्ष द्या. आमच्या मागण्या ज्येष्ठ नेते शरद पवारांना सांगा, तुम्ही सांगितल्या तर त्या मान्य होतील,' असे गाऱ्हाणे खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाराज आमदार दिलीप मोहिते यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे मांडले. 

आमदार मोहिते यांनी तहसीलदारांपासून पोलिसांच्या कामाबाबत नाराजी व्यक्ती करत त्यांच्या बदलीची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. विशेषतः महाळुंगे पोलिस चौकी तातडीने बंद करावी, यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना साकडे घातले होते. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच पक्षावर नाराज असलेल्या मोहिते यांनी रोहित पवार यांच्याकडे आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. 

महाविकास आघाडीच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ वाकी बुद्रूक (ता. खेड) येथे रोहित पवारांची सभा झाली. त्या सभेत बोलताना मोहिते यांनी त्यांच्या मनातील नाराजीची भावना बोलून दाखवली. 

ते म्हणाले की, "चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे व्यवस्थापन अधिकारी ठेकेदारांना भागीदार आहेत. गुन्हेगारांना, भाईला काम दिले जाते. पण स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचा विचार केला जात नाही, त्यामुळे मी कंपनी अधिकाऱ्यांकडे भांडतो, त्यात काय चूक आहे?' 

"पोलिस अधिकाऱ्यांची ठेकेदारी अनेक कंपन्यांत आहे. त्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. महाळुंगे पोलिस चौकी तत्काळ बंद करा, तेथे फक्त हप्ते गोळा केले जात आहेत. कंपनीच्या मालकांनी पोलिसांना कंपनीत बोलविले तर ते तत्काळ त्यांच्यापुढे हजर होतात. पण, आम्ही पोलिसांना बोलविले तर ते येत नाहीत. पोलिसांकडून कामगारांवर अन्याय होतो, याचा विचार झाला पाहिजे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातून आम्हाला (चाकण पोलिस ठाण्याला) बाहेर काढा. आयुक्तालयात आम्हाला, तालुक्‍यातील नागरिकांना मान मिळत नाही. गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना महाळुंगे पोलिस चौकी बंद करावी, यासाठी मी निवेदने दिली, तरी ती बंद करण्यात आली नाही,' अशी खंत मोहिते यांनी बोलून दाखवली. 

भामा-आसखेड धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला, तर कळमोडी धरणाचे पाणी आंबेगाव तालुक्‍याला दिले जाणार नाही. कारण, आम्ही जर पाणी दिले तर आमच्या तालुक्‍याला पाणीच शिल्लक राहणार नाही, असे म्हणत मोहिते यांनी पाणीप्रश्‍नावर संघर्षांची भूमिका घेण्याचे संकेत दिले. 

"आमदार रोहितदादा हे शरद पवार यांचे लाडके नातू आहेत. त्यांचा हट्ट शरद पवार मान्य करतात; म्हणून मी त्यांच्याकडे मागणी करतो आहे,' असे मोहितेंनी सांगितल्यावर उपस्थितांनी हसून दाद देत टाळ्या वाजविल्या. यावर आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, कंपन्यांचे अधिकारी राजकारण करत असतील, तर नेत्यांना सांगून ते प्रश्न सोडविले जातील. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. पोलिसांचा विषय पालकमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मांडू.' 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com