...अन्‌ राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भरला 100 रुपये दंड !  - ... Minister of State Dattatreya Bharane pays Rs 100 fine due to without mask! | Politics Marathi News - Sarkarnama

...अन्‌ राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भरला 100 रुपये दंड ! 

राजकुमार थोरात 
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

कोरोनाच्या काळात जनतेने जबाबदारीने मास्कचा वापर करावा.

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील जंक्‍शन येथील एका कार्यक्रमात बोलताना तोंडावरील मास्क निघाला; म्हणून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी लासुर्णे ग्रामपंचायतीकडे विना मास्कचा 100 रुपयांचा दंड भरला.

आपणच दंड नाही भरला तर तोच पायंडा तालुक्‍यात पडेल आणि कोरोनाच्या काळात जनतेने जबाबदारीने मास्कचा वापर करावा, या उद्देशाने भरणे यांनी हे पाऊल उचलले. तालुक्‍यातील जनतेनेही हा धडा घेऊन मास्क वापरण्याची गरज आहे. 

इंदापूर तालुक्‍यात गेल्या चार दिवसांत 171 कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागले आहेत. तालुक्‍यात शनिवारपर्यंत (ता. 31 ऑक्‍टोबर) कोरोना रुग्णांची संख्या 3364 पर्यंत पोचली आहे. धोका टळलेला नसूनही तालुक्‍यातील अनेक नागरिक बेजाबदारपणे वागत आहेत. बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहेत. तसेच अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडविला जात आहे. दिवाळीच्या तोंडावर रुग्ण वाढू लागल्याने इंदापूरकरांसाठी धोक्‍याची घंटा आहे. 

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते जंक्‍शनमध्ये रविवारी (ता. 1 नोव्हेंबर) एका दुकानाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी अनेक नागरिक विनामास्क कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी भरणे यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करून सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. पण, भाषण सुरू असतानाच भरणे यांचा मास्क खाली सटकला होता. भाषणानंतर भरणे यांनी स्वत:हून विनामास्कचा शंभर रुपयांचा दंड लासुर्णे ग्रामपंचायतीकडे भरला. 

या वेळी वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, मोहन ठोंबरे, लक्ष्मण साळवे उपस्थित होते. लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे कोरोनाच्या बाबतीमध्ये गंभीर असताना जनता मात्र कोरोनाच्या बाबतीत गांभीर्याने वागत नसल्याचे दिसून येते.

आगामी काळात तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी नागरिकांनी वेळीच सावध होवून योग्य दक्षता घेण्याची गरज आहे. भरणे यांनी भरलेल्या दंडातून इंदापूरची जनता बोध घेणार का? हे महत्वाचे असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख