शरद पवारांना ती भेट टळल्याची चुटपूट  - Memories of Shivajirao Bhosale awakened by Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

शरद पवारांना ती भेट टळल्याची चुटपूट 

संतोष शेंडकर 
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

मी शिवाजीरावांना भेटायला निघालो होतो. अगदी गाडीतसुद्धा बसलो होतो.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : "विमलताई गेल्याचं कळाल्यावर मी शिवाजीरावांना भेटायला निघालो होतो. अगदी गाडीतसुद्धा बसलो होतो. पण ते दवाखान्यात गेलेत असं समजलं...' असं बोलून ज्येष्ठ नेते शरद पवार काही काळ स्तब्ध झाले. मित्राची शेवटची भेट टळल्याची चुटपूट त्यांना लागली होती. 

वाणेवाडी (ता. बारामती) येथील पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांचे शुक्रवारी (ता. 31 ऑक्‍टोबर) वृद्धापकाळाने निधन झाले. पवार यांच्याशी 1962 पासून त्यांची घनिष्ठ मैत्री होती. भोसले यांच्या पत्नी विमलताई यांचे 18 ऑक्‍टोबरला निधन झाले. ते समजल्यानंतर पवार यांनी भोसले यांना भेटायला जाण्याचे नियोजन केले. पवार भेटायला निघालेही; पण भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्याला उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच काल भोसले यांचे निधन झाले. त्यानंतर शरद पवार आणि प्रतिभा पवार या दांपत्याने आज सकाळी सव्वादहा वाजता भोसले कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. 

या वेळी पवार यांनीही मित्राची शेवटची भेट होऊ न शकल्याची खंत व्यक्त केली. या प्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, रमेश भोसले, प्रवीण भोसले, विक्रम भोसले, नलिनी शरद काळभोर, विजया अशोक टेकवडे, उज्ज्वला मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. 

भेटीला आल्यावर पवार यांनी भोसले दांपत्याच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. दोन वेळा त्यांनी "मी परवा भेटण्यासाठी गाडीतसुद्धा बसलो होतो...' असा उल्लेख केला. थोडावेळ पवार दांपत्य स्तब्ध राहिले.

त्यानंतर पवारांनीच सोमेश्वरच्या अध्यक्षांना, "कारखाना सुरू झाला का?' असा प्रश्न विचारला. दसऱ्यापासून कारखाना सुरू केल्याचे सांगितल्यावर पवार यांनी समाधान व्यक्त केले. माळेगाव सुरू झालाय का? अशीही चौकशी केली. सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजला किती विद्यार्थी आहेत. त्यातील स्थानिक किती, बाहेरचे किती असेही अध्यक्षांना विचारले. 

पवार यांनी शिवाजीराव भोसले यांच्या मुला-मुलींची, नातवंडांचीही सखोल चौकशी केली. शिवाजीराव कारखान्यात संचालक होते का? असे विचारत "ते तालुक्‍याला सभापती होते, जिल्हा बॅंकेला होते, हे आठवतंय पण पुढचं माहित नाही' असी पुस्ती जोडली. ते एक पंचवार्षिक कारखान्याचे संचालक होते, असे या वेळी पवार यांना सांगण्यात आले. त्यानंतर "खूप व्यस्त कार्यक्रम आहे. सावंतवाडीला जायचंय,' असं म्हणून पवार यांनी सर्वांचा निरोप घेतला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख