matang community demands mlc seat from governor quota | Sarkarnama

मातंग समाजाला पहिल्या विधान परिषद सदस्यत्वाची आस, मात्र त्यावर बागवेंचा 'डोळा'

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

बहुतेक कार्यकर्ते हे राजकीय व्यक्तीला पद नको, या भुमिकेचे आहेत. समाजाता अनेक अभ्यासक, कलाकार आहेत त्यांचा सन्मान व्हावा, अशी त्यांची मागणी आहे.

पुणे: महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून विधान परिषदेत मातंग समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले नसल्याची खंत समाजातील सुशिक्षित युवकांना आहे. त्यांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 'मातंग स्पीक्स' ही मोहीम सुरू केली आहे. या प्रक्रियेतून अनेक नावांची चर्चा असलीतरी त्यात माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी जोरदार लॉबिंग केले आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यपाल नियुक्त सर्वच्या सर्व 12 जागा रिक्त झाल्या. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीला या 12 जागा भरण्याचे वेध  लागले आहेत. राज्यपालनियुक्त जागांसाठी राज्याचे मंत्रीमंडळ शिफारस करते. मग राज्यपाल त्या नावांवर शिक्कामोर्तब करतात, ही प्रक्रिया आहे. मात्र तत्पुर्वी महाविकास आघाडीतील पक्षांना त्या जागा आपसांत वाटून घ्याव्या लागणार आहे. मात्र त्यासंबंधीची चर्चा अजून अंतिम झालेली नाही. शिवाय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देईल ती नावे अंतिम करणार का, याविषयी सत्ताधाऱ्यांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे ही प्रक्रिया संथपणे सुरू आहे. इच्छुक आपापल्या नेत्यांकडे लॉबिंग करत आहेत.

राज्यपालनियुक्त जागेसाठी निकष आहेत. समाजकारण, सहकार, साहित्य, कला क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती या पदासाठी पात्र असते. मात्र या नियुक्त्यांवेळी या निकषांपेक्षा सामाजिक प्रतिनिधीत्वाचा विचार होतो. नेत्यांचे राजकीय पुनर्वसन म्हणूनही या जागांकडे पाहिले जाते. रिक्त झालेल्या 12 जागांपैकी 2 धनगर समाजाचे आमदार होते. त्यामुळे आता पुन्हा संधी मिळेल या अपेक्षेत धनगर नेतेही आहेत. माळी समाजातून मागणी आहे. मात्र मातंग समाजात यासाठी खऱ्या अर्थाने उठाव झालेला आहे. यासाठी राजकीय व्यक्तींनी नव्हे तर समाजातील बु्द्धीवादी युवकांनी पुढाकार घेतला आहे. राज्याची निर्मिती झाल्यापासून विधान परिषद या वरिष्ठ सभागृहात एकाही मातंग समाजातील व्यक्तीला संधी मिळाली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सर्वच राजकीय पक्षांनी समाजाला डावलले
आहे, अशी त्यांची खंत आहे. त्यामुळे त्यांनी 'मातंग स्पीक्स' ही मोहीम सोशल मिडीयावर चालवली. त्यातून समाजाची जाग्रती होवून या मागणीला बळ आले आहे. यासंबंधाने पुण्यात सातत्याने बैठका सुरू आहेत. यात राजकीय कार्यकर्ते सहभागी आहेत. संबंधितांनी आपापल्या पक्षाकडे प्रयत्न करावेत, असेही ठरले आहे. या लॉबिंगमध्ये काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी आघाडी घेतली आहे.

रमशे बागवे माजी राज्यमंत्री आहेत. ते पुण्यातून आमदार म्हणून निवडून आले होते. यावेळी ते कॅन्टॉन्मेंट मतदारसंघातून उभे होते, मात्र त्यांचा पराभव झाला. मातंग समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांना काँग्रेसने आमदार करावे, अशी त्यांची इच्छा आहे.  मात्र बहुतेक कार्यकर्ते हे राजकीय व्यक्तीला पद नको, या भुमिकेचे आहेत. समाजाता अनेक अभ्यासक, कलाकार आहेत त्यांचा सन्मान व्हावा, अशी त्यांची मागणी आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख