SP संदीप पाटलांच्या निरोपावेळी कठोर पोलिस अधिकारी-कर्मचारीही झाले भावूक...! - many police offcres become emotional at send off of SP Sandip Patil | Politics Marathi News - Sarkarnama

SP संदीप पाटलांच्या निरोपावेळी कठोर पोलिस अधिकारी-कर्मचारीही झाले भावूक...!

भरत पचंगे
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

संदीप पाटील यांची गडचिरोलीची पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून बढतीने बदली झाली आहे. ते आज तेथील कार्यभार स्वीकारणार आहेत.

शिक्रापूर : जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस अधिकारी आणि पोलिसांसाठी हक्काचे व  जिव्हाळ्याचे असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी  आपला पदभार अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांचेकडे सुपूर्द केला. पाटील यांना निरोप देण्यासाठी आयोजित परेडवेळी आणि नंतरही अनेक अधिकारी-कर्मचा-यांना आपल्या भावनांचा आवरता आले नाही. पर्यायाने एरवी अत्यंत कठोर समजल्या जाणा-या अनेक पोलिस अधिकारी-कर्मचा-यांसाठी अनाहुतपणे समोर आलेला भावूक होण्याचा क्षण जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाने मंगळवारी (ता. 8) कदाचित पहिल्यांदाच अनुभवला.

सन २०१८ मध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.संदीप पाटील यांना मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने चाकणमध्ये झालेल्या दंगलीची सलामी झाली. हे आव्हान आणि पुढे कोरेगाव-भिमा दंगलीनंतरची स्थिती हाताळण्यासाठीही तसेच कायम राहिले. राजकीय, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक अशा सर्वच स्तरावर राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक म्हणून यापूर्वी विक्रम बोके, विश्वास नांगरे-पाटील, लक्ष्मीनारायण, सुरेश खोपडे यांनी जो कार्यकाल गाजविला आणि सामान्य जनतेत सन्मानाचे स्थान पटकावले त्याच प्रतिमेच्या शोधात जिल्हा असताना अत्यंत निस्पृह व नॉनकरप्ट समजले जाणारे सुवेझ हक यांच्यानंतर संदीप पाटील यांची पुणे जिल्ह्यात नेमणूक झाली.

सातारा जिल्ह्यात एका बड्या राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करणारे म्हणून राज्यात दबदबा असलेले डॉ. पाटील यांनी आपल्या बटुमुर्तीची चुणूक पुणे जिल्ह्याला दाखविली आणि झोपडपट्टी दादा नियंत्रण कायद्यांतर्गत तसेच मोकांतर्गत आजापर्यंत सर्वाधिक गुन्हे दाखल करुन अनेकांना जेरबंद करुन गुन्हेगारी क्षेत्रावर तर चांगलाच वचक बसविला.

अधिकारी-कर्मचा-यांचा खरा सखा....!

मनासारखी बदली हवी, कामात दिलासा आणि ड्यूटीमध्ये सुलभता हवी एवढ्याच मोजक्या अपेक्षा सामान्य पोलिस अधिकारी-कर्मचा-यांच्या असतात. ही नेमकी नस सापडलेले अधिकारी म्हणून डॉ.पाटील हे जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचा-यांमध्ये प्रचंड लोकप्रिय व आदरयुक्त भितीचे होते. यावर्षी तब्बल १७९ कर्मचा-यांच्या बदल्या त्यांना हव्या त्या ठिकाणी करुन देण्याचे त्यांचे हे काम जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा नोंद होईल असे आहे. पर्यायाने डॉ.पाटील साहेब जाणार या चर्चेने गेल्या आठ दिवसांपासून अनेक अधिकारी-कर्मचारी खुपच भावूक झालेले दिसले. विशेष म्हणजे त्यांच्या आजच्या निरोप समारंभाचे सर्व फोटो, व्हिडिओ जिल्ह्यातील बहुतेक सर्वच अधिकारी-कर्मचा-यांनी आपापल्या सोशल मिडिया `स्टेटस`ला ठेवले यातच डॉ.पाटील यांची प्रतिमा या सर्वांच्या मनात काय आहे त्याचा अंदाज यावा.

आणि झाला भावूक निरोप समारंभ...!

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टंसींग हवे, उगाच सहकारी अधिकारी-कर्मचा-यांबाबत रिस्क नको म्हणून निरोपाचे सर्व शासकीय सोपस्कर टाळण्याचा इरादा डॉ.पाटील यांनी सर्वांना आज सकाळीच कळविला होता. मात्र त्यांच्या या ’आदेशा’ला कुणीच न पाळता त्यांना उघड्या जीपमध्ये सन्मानाने उभे करुन संपूर्ण पोलिस अधिक्षक कार्यालय आवारात फुलांच्या पायघड्यांवर त्यांना मिरविले. साहेबांच्या निरोपावेळी अनेकांना भावना अनावर झाल्या तर अनेक अधिकारी-कर्मचारी काहीच न बोलता डोळे पाणवून साहेबांना निरोप देताना भावूक झाल्याची माहिती कार्यालयीन अधिकारी रमेश खुने यांनी दिली. दरम्यान या निरोपसमारंभ प्रसंगी दिपाली खन्ना, गजानन टोणपे, नारायण शिरगावकर, आण्णा जाधव, नवनीत कावत, सई भोरे-पाटील, राजेंद्र कदम, अनिल लंबाते आदी जिल्ह्यातील उपविभागिय पोलिस अधिकारी आणि हवेली व भोरचे काही मोजके अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख