किरीट सोमय्या बारामतीतून कोणावर तोफ डागणार?

सोमय्या यांच्या बारामती भेटीचे कारण मात्र वेगळेच आहे.
किरीट सोमय्या बारामतीतून कोणावर तोफ डागणार?
Kirit Somaiya will arrive in Baramati next Thursday

बारामती : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे येत्या गुरुवारी (ता. ९ सप्टेंबर) बारामतीत येत आहेत. सोमय्या बारामतीत येणार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी सोमय्या यांच्या बारामती भेटीचे कारण मात्र वेगळेच आहे. (Kirit Somaiya will arrive in Baramati next Thursday)

सध्या किरीट सोमय्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांना लक्ष्य केलेले आहे. त्यांच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी सोमय्या यांनी नुकतीच सांगली येथे भेट देत तेथे काही सेल्फीही काढलेले होते. खरमाटे यांनी बारामती तालुक्यातही काही मालमत्तांची खरेदी केल्याची माहिती किरीट सोमय्या यांच्यापर्यंत पोचलेली आहे. त्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ते गुरुवारी बारामतीत येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली. 

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हेही त्यांच्यासमवेत असतील. बारामती तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीने ते मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन घेणार असल्याचे मोटे यांनी स्पष्ट केले. सोमय्या येणार आणि तेही बारामतीत म्हटल्यावर साहजिकच पत्रकार परिषदही होणार असून सोमय्या आता बारामतीत काय तोफ डागणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
 

परिवहन मंत्री अनिल परब आणि परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर किरीट सोमय्या यांनी सध्या संपूर्ण लक्ष केंद्रीत केलेले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही नेते ईडीच्या रडारवर येणार असल्याचे जाहीर करून त्यांनी अगोदरच खळबळ उडवून दिलेली आहे. आता बारामतीत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात येऊन सोमय्या नेमके काय बोलणार कोणावर? काय आरोप करणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. 
आमदार गोपीचंद पडळकर व माजी खासदार किरीट सोमय्या यांची बारामती भेट एकत्रित होत असल्याने त्यांच्या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार हे मात्र नक्की. 

Related Stories

No stories found.