बारामतीत जनता कर्फ्यू लागू होणार? - Janata Curfew may be imposed in Baramati from Today Evening | Politics Marathi News - Sarkarnama

बारामतीत जनता कर्फ्यू लागू होणार?

मिलिंद संगई
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

गेल्या तीन दिवसात तब्बल २९७ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यानंतर आज बारामतीचे प्रशासन खडबडून जागे झाले. बारामतीतील रुग्णांचा विस्फोट पाहता बारामतीत प्रशासन आता काही ठोस निर्णय घेणार हे स्पष्ट झाले आहे.लॉकडाऊन तांत्रिकदृष्टया शक्य नसल्याने जनताकर्फ्यूचा वापर होण्याची शक्यता आहे.

बारामती : गेल्या तीन दिवसात तब्बल २९७ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यानंतर आज बारामतीचे प्रशासन खडबडून जागे झाले. बारामतीतील रुग्णांचा विस्फोट पाहता बारामतीत प्रशासन आता काही ठोस निर्णय घेणार हे स्पष्ट झाले आहे. 

साखळी तोडण्यासाठी चौदा दिवसांचा कालावधी लागत असल्याने चौदा दिवसांचा लॉकडाऊन करण्याची सूचना वैद्यकीय व्यावसायिकांनी केली आहे. त्या मुळे शहरात चौदा दिवस पुन्हा लॉकडाऊन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

लॉकडाऊन तांत्रिकदृष्टया शक्य नसल्याने जनताकर्फ्यूचा वापर होण्याची शक्यता आहे.  बारामतीत तपासण्यांची संख्या वाढताच कोरोना रुग्णांच्या संख्येचा अक्षरशः उद्रेक झाला. बारामतीत गेल्या २४ तासात ८९ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. गेल्या दोन दिवसात २०८ रुग्ण सापडले आहेत. इतक्या वेगाने रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासन हादरुन गेले आहे. 

दरम्यान आज संध्याकाळी बारामतीत जनता कर्फ्यूची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील अनेक जण झपाट्याने पॉझिटीव्ह येत असल्याने येत्या काही दिवसात ही संख्या अजून वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. रुग्ण संख्येचा वेग असाच राहिला तर व्यवस्था अपुरी पडू नये या साठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु झाले आहेत. आज बारामतीची रुग्ण संख्या तब्बल ११९८ झाली असून बारामतीतील मृत्यूचा आकडा ४४ वर गेला आहे. दरम्यान बरे झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय असून बारामतीत आजपर्यंत ५५६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेलेले आहेत. 
Edited By- Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख