BIG BREAKING - बारामतीत सोमवारपासून १४ दिवसांचा जनता कर्फ्यू - Janata Curfew in Baramati From Monday | Politics Marathi News - Sarkarnama

BIG BREAKING - बारामतीत सोमवारपासून १४ दिवसांचा जनता कर्फ्यू

मिलिंद संगई
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

चौदा दिवसांच्या या जनता कर्फ्यूमध्ये फक्त वैद्यकीय सेवा सुरु राहणार असून शहरात आणि तालुक्यात बाहेरुन येणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. जनता कर्फ्यूची बारामतीत अत्यंत कडक अंमलबजावणी होणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चौदा दिवसांचा कालावधी लागत असल्याने चौदा दिवसांचा लॉकडाऊन करण्याची सूचना वैद्यकीय व्यावसायिकांनी केली होती. त्या मुळे शहरात चौदा दिवस पुन्हा जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे.

बारामती : बारामती शहर आणि तालुक्यात येत्या सोमवारपासून १४ दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्यात येणार आहे. मागील तीन दिवसात कोरोनाचे ३०० रुग्ण आढळल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आज या जनता कर्फ्यूची माहिती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी दिली. आज दुपारीच 'सरकारनामा'ने याबाबतचा अंदाज व्यक्त केला होता. तो खरा ठरला आहे. 

चौदा दिवसांच्या या जनता कर्फ्यूमध्ये फक्त वैद्यकीय सेवा सुरु राहणार असून शहरात आणि तालुक्यात बाहेरुन येणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. जनता कर्फ्यूची बारामतीत अत्यंत कडक अंमलबजावणी होणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चौदा दिवसांचा कालावधी लागत असल्याने चौदा दिवसांचा लॉकडाऊन करण्याची सूचना वैद्यकीय व्यावसायिकांनी केली होती. त्या मुळे शहरात चौदा दिवस पुन्हा जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे.

वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, मेडीकलची दुकाने, वृत्तपत्रांचे वितरण व दुध सेवा वगळता इतर सर्वांनीच आपापले व्यवहार 21 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन तावरे व बारवकर यांनी एका पत्रकार परिषदेत केले. तावरे व बारवकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी किरणराज यादव या प्रसंगी उपस्थित होते. 

बारामती तालुक्याची व शहरातून नागरिकांनी बाहेर जाऊ नये व बाहेरच्या नातेवाईक किंवा इतरांना बारामतीत या काळात बोलावू नये, चौदा दिवस पुरेल इतका किराणा, भाजीपाला व आवश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवावा, असे सुचविण्यात आले आहे. स्वॅब तपासणी किंवा वैदयकीय कारणासाठी घराबाहेर पडल्यास व्हॉटसअँपवर डॉक्टरांची चिठ्ठी किंवा मेसेज असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. 

लॉकडाऊन तांत्रिकदृष्टया शक्य नसल्याने जनताकर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.  बारामतीत तपासण्यांची संख्या वाढताच कोरोना रुग्णांच्या संख्येचा अक्षरशः उद्रेक झाला. बारामतीत गेल्या २४ तासात ८९ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. गेल्या दोन दिवसात २०८ रुग्ण सापडले आहेत. इतक्या वेगाने रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासन हादरुन गेले आहे. दरम्यान लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. रुग्ण संख्येचा वेग असाच राहिला तर व्यवस्था अपुरी पडू नये या साठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु झाले आहेत. आज बारामतीची रुग्ण संख्या तब्बल ११९८ झाली असून बारामतीतील मृत्यूचा आकडा ४४ वर गेला आहे. दरम्यान बरे झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय असून बारामतीत आजपर्यंत ५५६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेलेले आहेत. 

दरम्यान १४ दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय बारामतीतील व्यापा-यांना विश्वासात न घेताच घेतल्याचा आरोप बारामती व्यापारी महासंघाने केला आहे. पाच दिवसांचा कर्फ्यू आम्हालाही मान्य होता, मात्र आता कुठे घडी सावरत असताना पुन्हा 14 दिवसांच्या या कर्फ्यूने व्यापा-यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे, बंदच करायचा होता तर कंपन्यांना का परवानगी दिली आणि बारामती सोबतच शेजारचे तालुकेही सील करणे गरजेचे असल्याचे महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख