आंबेगावातून शिवसेनेचा आमदार निवडून येऊ शकत नाही, हा आपल्यावर लागलेला डाग - I will make Shiv Sena's MLA from Ambegaon constituency : Adhalrao Patil | Politics Marathi News - Sarkarnama

आंबेगावातून शिवसेनेचा आमदार निवडून येऊ शकत नाही, हा आपल्यावर लागलेला डाग

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 जुलै 2021

आमच्या मुख्यमंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्रात विसरू नका.

पुणे  ः आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेचा आमदार निवडून येऊ शकत नाही, हा आपल्यावर लागलेला डाग आणि काळिमा आहे. पण, आंबेगावातून शिवसेनेचा उमेदवार का नाही निवडून येऊ शकत नाही. रात्रंदिवस मेहनत करणारा एखादा सक्षम उमेदवार असेल तर मी त्याला आंबेगावातून आमदार करून दाखवेन. पण, त्याने मी ज्याप्रमाणे दोन महिने लोकसभेसाठी काम केले होते. तसेच मनापासून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. (I will make Shiv Sena's MLA from Ambegaon constituency : Adhalrao Patil)

शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात राबविण्यात येत आहे. तालुक्यातील घोडेगाव येथील कार्यक्रमात आढळराव बोलत होते.

ते म्हणाले, सरकार आपलं असून मुख्यमंत्रीही आपले आहेत. येथील (आंबेगाव) लोकप्रतिनिधी गृहमंत्री असले तरी आपल्याला कोणाबद्दल वाईट वाटायचे कारण नाही. कोणी पालकमंत्री, कोणी अन्नमंत्री व्हा. पण, आमच्या मुख्यमंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्रात विसरू नका. होतोय काय की त्यांच्या (राष्ट्रवादी) तालुकाध्यक्षांचा फोटो मोठा असतो आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो छोटा असतो. ही असले चावटपणाचे काम ह्या लोकांनी बंद करावे, असेही आढळराव पाटील या वेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही 

आढळराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणता मग पुणे जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांनी (राष्ट्रवादी) शिवसेनेच्या गटनेते देविदास दरेकर यांना कधी काम करताना विचारले का. दरेकर यांनी सूचविलेल्या कामांमध्ये खो घातला जात आहे. मग ही कसली महाविकास आघाडी. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ताकदीचा वापर करून मोठमोठी पदे मिळवणार आणि आमच्यासारख्या गोरगरीब कार्यकर्त्यांना पायाखाली चेंगरणार का. ही महाविकास आघाडी नाही. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपल्याकडे जेमतेम सहा ते सात महिने राहिले आहेत. त्यामुळे सर्वांनी जोमाने कामाला लागावे. लोकसभेचे नंतर बघू. 

मग शिवसेना कशी वाढायची  

तुम्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आला ना. तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणून घेता. तुमच्याकडे शिवसेनेची पदे आहेत. पण, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जेव्हा मेळावा घ्या, बैठका घ्या, असे सांगितले जाते, त्यावेळी कुणीच पुढे येत नाही. मग, आपली शिवसेना कशी वाढायची, त्यांचा (राष्ट्रवादी) पक्ष वाढविण्याची ताकद मोठी आहे, असेही आढळराव पाटील यांनी नमूद केले. 

लोकांच्या कुबड्या घेऊन किती दिवस फिरायचे 

आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय कामे केली आहेत, हे शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन सांगितले पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. पण, त्यांनी कोणावरही प्रतिहल्ला केला नाही. आपण भले आणि आपले काम भले, असे त्यांनी काम केले आहे. आज त्यांना आपल्याला ताकद द्यायची आहे. लोकांच्या कुबड्या किती दिवस घेऊन आपण फिरणार आहोत. आपल्याला स्वतःच्या ताकदीवर कधीतरी शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख