राऊत हे मोदींना धमक्या देतात, मी तर आता घाबरलोय : दिलीप मोहिते - I am scared of Sanjay Raut's threat : MLA Dilip Mohite | Politics Marathi News - Sarkarnama

राऊत हे मोदींना धमक्या देतात, मी तर आता घाबरलोय : दिलीप मोहिते

राजेंद्र सांडभोर 
शनिवार, 5 जून 2021

मी मागच्या दाराने आमदार किंवा खासदार झालेला नाही. मी लोकांमधून निवडून आलेलो आहे.

राजगुरूनगर (जि. पुणे) : खासदार संजय राऊत हे मोठे नेते आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणावरही बोलण्याचा त्यांच्याकडे परवाना आहे. ते पंतप्रधानांनाही धमकी देऊ शकतात. मी तर छोटा माणूस आहे. माझ्या तालुक्यात येऊन त्यांनी मलाही धमकी दिली आहे. त्यामुळे मी घाबरलो आहे. मला त्यांची भीती वाटते; म्हणून सरकारला मला आता पोलिस संरक्षण द्यावे लागेल, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी दिली. (I am scared of Sanjay Raut's threat : MLA Dilip Mohite)

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेचे भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलेल्या संजय राऊत यांनी मोहिते यांच्यावर कडवट टीका केली होती. अजितदादांनी मोहितेंचा बंदोबस्त करावा; अन्यथा शिवसेनेला मुभा द्यावी, असा इशाराच त्यांनी दिला होता. त्यावर मोहिते बोलत होते.
 
ते म्हणाले की मी मागच्या दाराने आमदार किंवा खासदार झालेला नाही. मी लोकांमधून निवडून आलेलो आहे. त्यामुळे मला माजी आमदार करायचा निर्णय जनता घेईल. जनतेमध्ये जाऊन लोकांचा कौल घेतलेल्या एखाद्या नेत्याने, मला माजी आमदार करण्याची भाषा केली असती, तर बरे वाटले असते, असा चिमटाही आमदार मोहिते यांनी खासदार राऊत यांच्या राज्यसभा सदस्यावरून काढला.

हेही वाचा : अजितदादा दिलीप मोहितेंचा बंदोबस्त करा; अन्यथा शिवसेनेला मुभा द्या

हेही वाचा : आमदार दिलीप मोहितेंना माज आल्याचं दिसतंय : संजय राऊत

हेही वाचा : मोहितेंना माजी आमदार करण्याची व्यवस्था शिवसेना पुढच्या निवडणुकीत नक्की करेल

आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे नेतृत्व मान्य केले आहे. मुख्यमंत्री सांगतील, तसे आम्ही ऐकतो. मग माझ्यावर टीका करण्यापूर्वी राऊत यांसारख्या मोठ्या नेत्याने मला बोलावून वस्तुस्थिती जाणून घेऊन मग बोलायला पाहिजे होते. माझा त्या प्रकरणात काडीचाही सहभाग नाही, हे समजून घ्यायला पाहिजे होते. त्यांनी ऐकीव माहितीवर अशा प्रकारचे आरोप माझ्यावर करणे, हे चुकीचे आहे. मी सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांच्याशी बोलून त्यांना स्पष्टीकरण दिलेले होते. पण, राऊतसाहेब अचानक येऊन बोलले, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले. 

संजय राऊत यांना ही सर्व चुकीची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव देतात. कारण, सध्या काम नसलेला नेता हे फक्त आढळराव-पाटील आहेत. खासदार असताना त्यांनी काही केले नाही आणि खासदारकी गेल्यानंतर आता ते अस्वस्थ झालेले आहेत. फक्त, खेड तालुक्यात यायचं आणि राजकारण करायचं, एवढंच ते करतात. माझ्या तालुक्यावर त्यांचे विशेष प्रेम आहे. त्यांची इथे मालमत्ता आहे. ते बाकीच्या भोसरी, हडपसर, भोर इत्यादी मतदारसंघात जात नाहीत, असा चिमटा मोहिते यांनी आढळरावांना काढला.

जिल्हा कसा चालवयाचा, याचा निर्णय अजित पवार घेतात

पुणे जिल्ह्याचे नेते अजित पवार आहेत. जिल्हा कसा चालवायचा, याचे सर्व निर्णय ते घेतात. त्यांना राजगुरुनगरला आणून जागा दाखवल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढे कार्यवाही केली. पंचायत समितीच्या जागेवर, पंचायत समिती इमारतीसाठी जागा आहे आणि प्रशासकीय इमारत त्याच्या समोरच्या जागेत व्हावी. एवढी छोटीशीच गोष्ट होती. त्याचा पराचा कावळा यांनी केला, असेही मोहिते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख