हे राजकीय षडयंत्र; मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार - संजय काकडे - EX MP Sankaj Kakde Reaction about the Offence Registered against Him | Politics Marathi News - Sarkarnama

हे राजकीय षडयंत्र; मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार - संजय काकडे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

माजी खासदार आणि उद्योजक संजय काकडे यांनी सख्या मेव्हण्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार व्यावसायिक स्पर्धेतून घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले

पुणे : "माझा मेव्हणा युवराज ढमाले याने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यासंदर्भात अद्यापपर्यंत पोलिसांकडून कळवलेले नाही. ढमालेने माझ्यावर केलेल्या आरोपांची कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकारांकडूनच समजली. हे राजकीय षडयंत्र असून मी संबंधितांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. 

माजी खासदार आणि उद्योजक संजय काकडे यांनी सख्या मेव्हण्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार व्यावसायिक स्पर्धेतून घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.  युवराज ढमाले (वय 40, रा. धनकवडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार संजय काकडे (वय 52), पत्नी उषा काकडे (वय 44, दोघेही रा. यशवंत घाडगे नगर, रेंजहिल्स, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी ढमाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. काकडे आणि ढमाले यांचा भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय सुरु होता. मात्र, ढमाले यांनी 2010 पासून स्वतंत्र व्यावसाय सुरु केला होतो. त्यावरुन काकडे व फिर्यादी ढमाले यांच्यामध्ये मतभेद झाले होते.  दरम्यान, फिर्यादी ढमाले हे ऑगस्ट 2018 मध्ये काकडे यांच्या घरी गेले, तेव्हा काकडे यांनी त्यांना "तुला संपवायला वेळ लागणार नाही,'' अशा शब्दांत धमकी दिली होती. त्यानंतर काकडे यांनी 'मी सत्तेत आहे, पाहिजे ते करू शकतो. नीट राहा. माझे अनेक गुंडांशी संबंध असून, नीट राहा,'' असे सांगत त्यांचे मेव्हणे ढमाले यांना धमकावले होते. त्यानंतर पुढच्याच महिन्यात काकडे यांनी ढमाले यांना "तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस. तुला व तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन कधी संपवेल, माझे नाव ही कुठे येणार नाही. तुला गोळ्या घालून आजच संपवेल,'' अशा शब्दांत जिवे मारण्याची धमकी दिली होती, असे ढमाले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

याबाबत काकडे म्हणाले, "वास्तविक 29 ऑगस्ट 2017 आणि 29 ऑगस्ट 2018 या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी युवराज ढमाले पुष्पगुच्छ घेऊन आला असतानाच भेट झालेली आहे. या व्यतिरिक्त आजपर्यंत गेल्या तीन वर्षात त्याच्याबरोबर माझं बोलणंदेखील झालेले नाही. माझी पत्नीदेखील त्याच्याबरोबर एक वर्षापासून बोलत नाही. तसेच, गेल्या दहा वर्षांपासून आमचा कोणताही व्यवसाय ढमालेबरोबर भागिदारीमध्ये नाही. त्यामुळे ढमाले याने माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत. यामागे राजकीय षडयंत्रदेखील असू शकते. कोणीतरी त्याला पुढे करून अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्याचे काम केले असावे, अशी शंका वाटते. या गुन्ह्या संदर्भात मी कायदेशीर सल्ला घेऊन संबंधितांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे."

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख