EXCLUSIV : आंतरराष्ट्रीय खेळाडूला क्रीडामंत्र्यांच्या सचीवाच्या सूचनेनुसार सरावाला परवानगी?

क्रीडा संस्था बंद असतानाही पुण्यात एका मान्यवर शिक्षण संस्थेच्या कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या टेबल टेनिस हाॅलमध्ये एक महिला खेळाडू सराव करीत असल्याची माहिती समोर आली आहे. या खेळाडूबरोबर अन्य काही खेळाडूही तिथे यायला लागले आहेत, असेही समजते.
How Table Tennins Allowed in Pune
How Table Tennins Allowed in Pune

पुणे : कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी देशभरात चार लाॅकडाऊन लावण्यात आले. आता 'अनलाॅकिंग'ची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, एकट्याने व्यायाम करायला, चालायला किंवा सायकलिंग करायला परवानगी असली तरी खेळांच्या सरावांना मात्र परवानगी नाही. मात्र, मूळच्या दिल्लीच्या एका क्रीडापटूला पुण्यात सरावाची 'परवानगी' मिळाली आहे.  हा सराव थांबवू नये, अशा सूचना केंद्रीय क्रिडामंत्री किरण रिज्जू यांच्या एका सचीवाने पुण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. 

लाॅकडाऊनच्या काळात जीम, जलतरण तलाव, स्पोर्टस क्लब यांना बंदी आहे. अद्याप ही बंदी उठलेली नाही. आम्हाला परवानगी द्या, अशी मागणी अनेक खेळांच्या संघटनांकडून केली जात आहे. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. जे खेळाडू 'Elite' आहेत, अशांना तरी फिजिकल डिस्टन्सिंग व अन्य निकष  पाळून परवानगी द्यावी, अशी विनंती काही खेळाडू करत आहेत. पण त्यांनाही ही परवानगी देण्यात आलेली नाही.

क्रीडा संस्था बंद असतानाही पुण्यात एका मान्यवर शिक्षण संस्थेच्या कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या टेबल टेनिस हाॅलमध्ये एक महिला खेळाडू सराव करीत असल्याची माहिती समोर आली आहे. या खेळाडूबरोबर अन्य काही खेळाडूही तिथे यायला लागले आहेत, असेही समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही खेळाडू मुळची दिल्लीची आहे. या सरावाची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्याचे काही पोलिस तिथे गेले होते आणि त्यांनी संबंधित खेळाडूला हा सराव थांबवण्यास सांगितले होते. 

मात्र, त्यानंतर चक्रे हलली व क्रीडा मंत्र्यांच्या एका सचीवाने पुण्याच्या एका अतीवरिष्ठ अधिकाऱ्याला या सरावाकडे दुर्लक्ष करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.  'संबंधित खेळाडू ही काॅमनल्वेल्थ खेळाडू असून आॅलिंपिकसाठी ती प्रयत्न करते आहे. तिला सरावासाठी परवानगी द्यावी. पोलिसांनी सराव बंद करु नये म्हणून आपण हस्तक्षेप करावा, अशी विनंती मा. क्रीडा मंत्र्यांनी आपणाला करण्याच्या सूचना दिल्या आहेत,' असे रिज्जू यांच्या व्यक्तीगत सचीवाने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. याबाबत खात्री करुन घेण्यासाठी पुण्याचे सह आयुक्त डाॅ. रविंद्र शिसवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

मग इतरांना परवानगी का नाही

आता थेट क्रीडामंत्र्यांच्या सचीवानेच सांगितल्यावर सराव अडथळ्याविना सुरु राहिला आहे. हा प्रकार पोलिस खात्यात आणि क्रीडा क्षेत्रातही चर्चिला जात आहे. एकट्या दुकट्या खेळाडूला परवानगी देण्याचे कारण काय, असा सवाल विचारला जात आहे. लाॅकडाऊनमुळे नुकसान सगळ्यांचेच होते आहे. क्रीडापटूंनाही याचा मोठा फटका बसला आहे. तरीही देशातली परिस्थिती,  कुणाला परवानगी मिळाली याबद्दल आम्हाला दुःख नाही, मात्र कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता सगळ्यांना सारखा नियम लावला गेला पाहिजे, एका खेळाडूला परवानगी द्यायची असेल तर अन्य खेळाडूंनाही ती मिळाली पाहिजे, असा सूर आता उमटू लागला आहे.

लाॅकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात येस बँक प्रकरणातले संशयित वाधवा बंधूंना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिल्याचे प्रकरण गाजले होते. त्यावेळी गृह खात्याचे प्रधान सचीव अमिताभ गुप्ता (आयपीएस) यांना निलंबित करण्यात आले होते. मंत्री पातळीवर याची काहीच कल्पना नव्हती, असे त्यावेळी सांगितले गेले होते. मागे एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'चहापेक्षा किटली गरम...' असे सांगत नोकरशहांच्या मानसिकतेचे वर्णन केले होते. पुण्यात एका खेळाडूला सरावाची परवानगी द्यावी, हे सांगताना असाच काहीसा प्रकार घडला असावा की काय, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com