कुल गटाशी हातमिळवणी करत पटकावले सरपंचपद : बहुमत मिळूनही थोरात गट सत्तेपासून वंचित  - Election of Sameer Dorge as Sarpanch of Yavat Gram Panchayat | Politics Marathi News - Sarkarnama

कुल गटाशी हातमिळवणी करत पटकावले सरपंचपद : बहुमत मिळूनही थोरात गट सत्तेपासून वंचित 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

यवतची सरपंच निवडणूक ही राज्याच्या मुख्यमंत्री निवडीचेच एक छोटे मॉडेल आहे.

यवत (जि. पुणे) : भाजपच्या आमदार राहुल कुल गटाशी हातमिळवणी करत समीर दोरगे यांनी यवत (ता. दौंड) गावचे सरपंचपद पटकावले, त्यांनी नऊ विरूद्ध आठ मतांनी सदानंद दोरगे यांचा पराभव केला. सुजाता कुदळे यांचा दहा विरूद्ध सात मतांनी पराभव करत सुभाष यादव उपसरपंचपदी निवडून आले. 

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाचे नऊ, तर आमदार राहुल कुल गटाचे आठ सदस्य निवडून आले होते. थोरात गटाकडून सतत तीन वेळा निवडून आलेले समीर दोरगे व माजी जिल्हा परिषद सुरेश शेळके यांचे पुत्र गणेश शेळके यांचा पराभव केलेले माजी उपसरपंच सदानंद दोरगे यांच्यात सरपंचपदासाठी चुरस होती. मात्र, ऐनवेळी समीर दोरगे व त्यांचे सहकारी इम्रान तांबोळी यांनी सरपंचपदासाठी कुल गटाशी संधान साधले. कुल गटातील प्रवेशाबाबत दोरगे यांनी मौन बाळगले, तर इम्रान तांबोळी यांनी कुल गटात प्रवेश केला नसल्याचे सांगितले. 

ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेलचा पराभव झालेल्या कुल गटाची ताकद वाढली. त्यांनी आपल्या गटाचा पाठिंबा देत समीर दोरगे यांना सरपंच होण्यास मदत केली. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सुभाष यादव यांनी थोरात गटातून कुल गटात प्रवेश केला होता. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांना अपेक्षेहून एक मत अधिक मिळाले. सरपंच समीर दोरगे व उपसरपंच सुभाष यादव या दोघांनीही थोरात गटाकडून यापूर्वी यवत गावच्या उपसरपंचपदाची धुरा संभाळलेली आहे. 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्ताराधिकारी मिलींद टांकसाळे, तर सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे व तलाठी कैलास बाठे यांनी काम पाहिले. 

दोरगे, तांबोळींना मतदार सजा देतील 

यवत गावाने आमच्या पॅनेलच्या हाती सत्ता दिली होती. मात्र, समीर दोरगे आणि इम्रान तांबोळी या चोरांनी ती पळवून विरोधकांच्या घशात घातली. दर पाच वर्षांनी निवडणुका होत असतात. मतदार हा राजा असतो. तो याची सजा दिल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना थोरात गटाचे पॅनेलप्रमुख कुंडलीक खुटवड यांनी व्यक्त केली. 

सरपंचपदाच्या दावेदाराकडे आली विरोधी पक्षनेत्याची भूमिका 

सत्ता स्थापनेच्या वेळी राज्याच्या राजकारणात ज्या घडामोडी झाल्या, त्याचे छोटे मॉडेल यवतच्या सरपंच निवडणुकीत पहावयास मिळाले. कुल गटाचे प्रमुख सुरेश शेळके यांनी येथे शरद पवारांची भूमिका बजावली. थोरात गटातील समीर दोरगे यांना उद्धव ठाकरेंप्रमाणे (मुख्यमंत्री) सरपंचपदी निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली.

थोरात गटातून आधीच कुल गटात आलेल्या उपसरपंच सुभाष यादव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका हुबेहुब वठवली. त्यामुळे यवतची सरपंच निवडणूक ही राज्याच्या मुख्यमंत्री निवडीचेच एक छोटे मॉडेल आहे. या सर्व रणधुमाळीत सरपंचपदाचे प्रबळ दावेदार सदानंद दोरगे यांच्या वाट्याला मात्र देवेंद्र फडणवीसांप्रमाणे विरोधी पक्षनेत्याची भूमिका आली आहे, असे आजच्या घडामोडीचे वर्णन कीर्तनकार दीपक मोटे यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख