विधानपरिषद निकालांनी फडणवीस, चंद्रकांत पाटलांची झोप उडाली - Election Results raising Concerns Before BJP Leaders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

विधानपरिषद निकालांनी फडणवीस, चंद्रकांत पाटलांची झोप उडाली

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

विधानपरिषदेसाठी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातले निकाल भाजपची झोप उडविणारे ठरले आहेत. नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदीप जोशींच्या पराभवाचा धक्का बसला आहे. तर पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचा विजय हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा 'सेटबॅक' आहे.

पुणे : विधानपरिषदेसाठी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातले निकाल भाजपची झोप उडविणारे ठरले आहेत. नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदीप जोशींच्या पराभवाचा धक्का बसला आहे. तर पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचा विजय हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा 'सेटबॅक' आहे.

विधान परिषदेच्या लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव निश्चित  केला. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास लाड यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. पुण्यात पदवीधरची निवडणूक चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. ते स्वतः या मतदारसंघाचे आमदार होते. या मतदारसंघात हॅटट्रीक करण्याच्या वल्गना भाजपच्या नेत्यांनी केल्या होता. मात्र, या निवडणुकीत चित्र पालटले. 

नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी व भाजपचे उमेदवार व नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यात लढत होती. ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र तिथेही भाजपला धक्का बसला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी काल सकाळी ८ वाजता सुरू झाली. पहिल्या फेरीची मोजणी पूर्ण झाली असून आज पहाटे दुसऱ्या फेरीची मोजणी सुरू झाली आहे. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मोजणीमध्येही कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय दृष्टीक्षेपात आला असून विजयासाठी आता केवळ ३८०० मतांची आवश्‍यकता आहे. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने आपली शक्तीपणाला लावत मराठवाडा पदवीधरची जागा तिसऱ्यांदा मिळवण्याच्या दृष्टीने दमदार पावले टाकली आहेत.

या निवडणुकीत मतांची टक्केवारी चांगली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. वाढलेले मतदान हे सरकारच्या विरोधात जाते असे मानले जाते. पण इथे मात्र ते भाजपच्याच विरोधात गेल्याचे दिसून येत आहे. गेले काही महिने भाजपचे नेते महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र तीन पक्षांच्या आघाडीसमोर भाजपची ताकद कमी पडते आहे की काय असे वाटू लागले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख