अविनाश भोसलेंच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले याला ईडीने ताब्यात घेतले असून त्याला मुंबईला नेण्यात आले आहे. काल ईडीने अविनाश भोसलेंच्या आॅफिसवर छापा टाकला होता.
Avinash Bhosale - Amit Bhosale
Avinash Bhosale - Amit Bhosale

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले याला ईडीने ताब्यात घेतले असून त्याला मुंबईला नेण्यात आले आहे. काल ईडीने अविनाश भोसलेंच्या आॅफिसवर छापा टाकला होता. ईडीचे अधिकारी काल दिवसभर या प्रकरणात चौकशी करत होते. सकाळी साडे आठ वाजता सुरू झालेली चौकशी मध्यरात्री पर्यंत सुरू होती.

अविनाश भोसलेंच्या ऑफिसवर काल सकाळी ईडीने छापा टाकला. अविनाश भोसले मोठे बांधकाम तसेच  हॉटेल व्यावसायिक आहेत. फेमा संबंधीच्या प्रकरणात ही कारवाई झाल्याची माहिती आहे. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अमित भोसलेला ताब्यात घेऊन मुंबईत नेले. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयात (ईडी) काल तब्बल आठ तासांहून अधिक काळ चौकशी झाली. भोसले यांची MH-01 DD 0088 या क्रमांकाची बेंटले कार सकाळपासून मुंबईतील बेलार्ड पियार्डमध्ये उभी होती. चाणाक्ष बातमीदारांच्या नजरेत ही गाडी आली आणि अविनाश भोसले यांची चौकशी सुरू असल्याची बातमी व्हायरल झाली.    

अविनाश भोसले हे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या शब्दाला वजन असल्याची चर्चा असते. थेट त्यांचीच चौकशी सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. परकीय चलनाविषयीच्या `फेमा` कायद्यांतर्गत त्यांची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापा मारल्याची घटना ताजी असतानाच भोसले  यांच्या चौकशीनेही राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. महाआघाडी सरकारमधील नेत्यांशी किंवा त्यांच्या संबंधित कुटुंबियांची तर चौकशी सुरू नाही ना, अशीही चर्चा यामुळे सुरू झाली.

आज सकाळी दहा वाजल्यापासून भोसले हे ईडीच्या कार्यालयात उपस्थित होते. रात्री साडे आठच्या सुमारास ते तेथून बाहेर पडले.  भोसले यांच्यासोबत नाशिकच्या काही मंडळींची चौकशी सुरू असल्याचे समजते. मात्र त्यांची नावे समजू शकली नाही.  भोसले यांचा पुण्यात आणि मुंबईत बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच देशभर त्यांची कंपनी पायाभूत क्षेत्रात काम करते. ईडीच्या नजरेत त्यांचे कोणते व्यवहार आले, याचा खुलासा नंतरच होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या कंपनीचे पुण्यात मुख्यालय आहे. तेथे ईडीने छापा मारल्याची चर्चा होती. मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही. पुण्यात कधी काळी रिक्षा चालविणारे अनिनाश भोसले हे मोठे बांधकाम व्यावसायिक झाल्याने त्यांच्याबद्दलच्या `सक्सेस स्टोरीज`ही सोशल मिडियात व्हायरल होत असतात.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com