पुणे : भोसरी एमआयडीसी जमीन प्रकरणात माजी महसूल मंत्री व भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत व या प्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी ED चे अधिकारी पुण्यात आले आहेत. अॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात हे अधिकारी थोड्याच वेळात पोहोचत आहेत.
वेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूलमंत्री होते. त्यावेळी पुण्याजवळील भोसरी येथील एमआयडीसीची जमीन दोन लाख रुपयांत खरेदी करुन ती सात कोटीं रुपयांना विकल्याचा व ते पैसे आपल्या कुटुंबियांच्या नावे फिरवल्याचा खडसे यांच्यावर आरोप आहे. या आरोपानंतर खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राजकीय पुनर्वसन न झाल्याने खडसे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. ही जमीन आपण नव्हे तर आपल्या पत्नीने खरेदी केली होती व याबाबतच्या चौकशीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोल्जर रिपोर्ट दिला असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे.
दरम्यान, याच प्रकरणात ईडीने खडसेंना नोटीस बजावली होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करुन खडसेंनी मुदत मागितली होती. याच काळात खडसेंची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली. त्यावेळी ईडीने खडसेंना चौकशीसाठी हजर राहण्याकरीता चौदा दिवसांची मुदत दिली होती. दरम्यान, पुण्याचे अॅड. असीम सरोदे हे एकनाथ खडसेंच्या विरोधात भोसरी एमआयडीसी प्रकरणाची केस चालवत आहेत. त्यामुळे या प्रकरणाबाबत त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी ईडी अधिकारी पुण्यात त्यांच्या कार्यालयात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. फोन करुन पूर्वकल्पना देऊन हे अधिकारी आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
२०१६ मध्ये भोसरी पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. आपण एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध केस चालवीत असल्याने भोसरी भ्रष्टाचार प्रकरणी माहिती घेण्यासाठी ईडीचे अधिकारी येणार असल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली. एकनाथ खडसे यांच्या भूखंड व्यवहार प्रकरणी काही माहिती सक्तवसुली संचालनालयास (ईडी) पाहिजे आहे, त्यासाठी ईडी कार्यालयातुन असीम सरोदे यांना फोन गेला आहे, असीम सरोदे यांची ईडीकडुन चौकशी असा काही प्रकार नाही, असे सरोदे यांच्या पत्नी रमा सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

