राष्ट्रवादी काॅंग्रेस हा खरचं मराठ्यांचा पक्ष आहे? - does NCP only belogns to Maratha community is the question | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी काॅंग्रेस हा खरचं मराठ्यांचा पक्ष आहे?

उमेश घोंगडे
बुधवार, 9 जून 2021

राष्ट्रवादी काॅंग्रेसचा 10 जून हा वर्धापनदिन. त्यानिमित्त हा आढावा.. 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेला आता 22 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून तळागाळात पक्षाचे केडर पसरले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून या पक्षाची वाटचाल सुरू आहे.  (NCP completes 22 years) 

कॉंग्रेसच्या मूळ विचारधारेशी फारकत न घेता 10 जून 1999 मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या पक्षाची स्थापना केली. पवारांच्या सोबत प्रत्येक भागातील तालेवार नेते गेले. पवारांनी अनेकांना मोठे केले. मंत्रीपदे दिली अशी सारी मंडळी पवारांसोबत गेली. पक्षाच्या स्थापनेपासून मराठ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसवर शिक्का बसला. पवार यांच्यासोबत आलेले नेते हे प्रामुख्याने मराठा होते. आपापल्या भागातले ते ताकदवान होते. या पक्षाला इतर बारा बलुतेदार जातींमध्ये म्हणावा तसा विश्‍वास निर्माण करता आला नाही, असे बोलले गेले. पण ही प्रतिमा खरेच तशी आहे का? पक्षातील कार्यकर्त्यांना काय वाटते?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस हा मराठ्यांचा पक्ष ही प्रतिमा अजिबात मान्य नाही. ते म्हणतात, ‘‘मुळत मराठ्यांचा पक्ष ही प्रतिमा माध्यमांनी निर्माण केली आहे. वस्तुस्थिती अजिबात तशी नाही. पक्षाच्या स्थापनेपासून मराठेतर बहुजन व मागासवर्गाला पक्षाचे अध्यक्ष पवार यांनी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी नावे घेऊन अनेक उदाहरणे सांगता येतील. ओबीसी व मागासवर्गाला सोबत घेण्यासाठी पवार यांना मराठा समाजाला सत्तेत कमी स्थान दिले आहे. उलट मराठा समाजाला कमी स्थान मिळाल्याची नाराजी माझ्यासारखा कार्यकर्त्यांमध्ये आहे.त्यामुळे राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष ही माध्यमांनी वर्षानुवर्षे तयार केलेली प्रतिमा चुकीची आहे.’’

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष हे छगन भुजबळ होते. त्यांनाच पक्षाने पहिले उपमुख्यमंत्री पद दिले. पक्षात त्यांचा दबदबा होता. त्यानंतर अरुण गुजराथी, मधुकर पिचड, सुनील तटकरे आदी मराठेतर प्रदेशाध्यक्ष झाले. छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी मराठेतर नेत्यांना पवारांनी नेहमीच प्राधान्य दिले. नवाब मलिक, लक्ष्मण ढोबळेंसारख्या मंडळींना पक्षाने जपले. तरीही पक्षाची अशी प्रतिमा का झाली? स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसींना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता. त्यातून उलट मराठा समाजात असंतोष होता. तरीही पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाला मराठ्यांचा पक्ष म्हणून शिक्का सहन करावा लागला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाकडून समाजाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पुरते पानिपत झाल्यानंतर राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाला उघडपणे पाठिंबा दिला.  

वाचा ही बातमी : राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटे का वाजलेत?

हा पक्ष सुरवातीपासून पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर राहिला. विविध जिल्ह्यांतील पाटील, पवार, मोहिते, भोसले, शिंदे, देशमुख अशा तालेवार मराठा घराण्यांचे नेते या पक्षात असल्याने तसा तोंडवळा झाला. खुद्द पवार यांची दिल्लीच्या राजकारणातील ओळख मराठा स्ट्राॅंगमम अशी झाल्याने तोच कित्ता मग इतरांनी ओढला आणि तोच शिक्का होऊन बसला. पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर मराठा नेतृत्वच पुढे होते. पक्षाचा जिल्हाध्यक्ष असो की कारखान्याचा, जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष येथे मराठा नेताच पक्षाकडून दिलेला असायचा. त्यामुळे स्थानिक जनतेतही तीच ओळख निर्माण झाली.

खरे तर पवारांनी माळी आणि धनगर समाजाला जोडून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून 2014 च्या निवडणुकीत हा समाज राष्ट्रवादीपासून दूर गेला. पक्षाने शिवाजीराव शेंडगे यांच्या कुटुंबाला जपले. त्यांच्या रमेश आणि प्रकाश दोन्ही मुलांना संधी दिली. मात्र ते देखील वेळ येताच फिरले. खरे तर कोणच्याच एका समाजाच्या मतांवर कोणताच पक्ष मुसंडी मारू शकत नाही. मुंबई, विदर्भ या दोन प्रमुख विभागांत राष्ट्रवादीची ताकद फारशी नाही. या दोन विभागांत मराठा समाजाचे प्राबल्य नाही. त्यामुळे येथून इतर समाजाचा कोणी जनतेतील नेता पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाही.  राष्ट्रवादीचा जोर हा प्रामुख्याने मराठाबहुल असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात असल्याने अनेकांच्या मनात ती प्रतिमा भिनली आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा अशा संघटनांना राष्ट्रवादीचे बळ असल्याचे बोलले जाते. त्यातूनही अशी प्रतिमा आणखी दृढ होते. राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी अमोल कोल्हे आणि सुनील तटकरे हे दोघे ओबीसी आहेत. आमदारांतही अनेक ओबीसी चेहरे आहेत. तरी पक्षाची प्रतिमा मराठ्यांचा पक्ष अशी झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख