संजय काकडेंची चिंता नको; चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला - Do Not Worry about Sanjay Kakade Chandrakant Patil to Opponents | Politics Marathi News - Sarkarnama

संजय काकडेंची चिंता नको; चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 डिसेंबर 2020

गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार काकडे हे भाजपाच्या व्यासपीठावर फारसे दिसत नाहीत. विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गेल्या महिन्यात झाली. या निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात काकडे यांचा फारसा सहभाग नव्हता. या काळात करण्यात आलेल्या जाहिरातीमध्येदेखील काकडे यांना स्थान नव्हते.

पुणे : माजी खासदार संजय काकडे यांच्याशी माझा सततचा संपर्क असतो.आम्ही एकत्रच असतो.त्यामुळे त्यांच्याबाबत तुम्ही काळजी करू नका, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लगावला. शनिवारी पुण्यात बोलताना त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर काकडे यांच्याबाबत खुलासा केला.

गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार काकडे हे भाजपाच्या व्यासपीठावर फारसे दिसत नाहीत. विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गेल्या महिन्यात झाली. या निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात काकडे यांचा फारसा सहभाग नव्हता. या काळात करण्यात आलेल्या जाहिरातीमध्येदेखील काकडे यांना स्थान नव्हते. या पार्श्वभूमीवर काकडे यांच्या संदर्भाने पत्रकारांनी पाटील यांना प्रश्‍न विचारला.प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘‘ माजी खासदार काकडे भाजपाचे सहयोगी खासदार होते. त्यांचा आणि आमचा सततचा संपर्क आहे. त्यांच्याबाबत इतरांनी काळजी करण्याचे कारण नाही.’’

राज्यात भाजपाची सत्ता नाही. त्यामुळे भाजपातील अनेकजण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राज्यातील अनेक आजी-माजी आमदारांची नावे यात घेतली जातात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस होता. माजी खासदार काकडे यांनी विविध वृत्तपत्रात पवार यांच्यावर लेख लिहिले होते. काकडे यांनी मुंबईत जाऊन पवार यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी बोलताना काकडे यांनी पवार यांच्याबद्दल आपलीची भूमिका मांडली होती. पक्ष वेगळा असला तरी पवार हे मोठे नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे स्थान मोठे आहे. मी दरवर्षीच पवार यांना शुभेच्छा देत असतो. त्यात वेगळे काही नाही, असे काकडे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे काकडे यांच्या मनात काय आहे. याबाबत तेव्हा चर्चा सुरू झाली होती. काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्यादेखील प्रसिद्ध झाल्या होत्या.

राज्यातील बदललेली सत्तेची समीकरणे आणि जिल्हा परिषदा व महापालिकांच्या येत्या दोन वर्षात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीने बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे काकडे यांच्यासारख्या नेत्यांना राष्ट्रवादी जवळ करू शकते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा विचार केला तर काकडे हे गेल्या निवडणुकीत भाजपाला उपयोगी पडले होते. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी त्याच पद्धतीने काकडे यांचा उपयोग करून घेऊ शकते. त्यामुळेच काकडे यांच्याबाबत पाटील यांनी घेतलेली भूमिका भाजपाच्या दृष्टीने महत्वाची आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख