Diffrences Between Pune Officials over Lock Down | Sarkarnama

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणे अवघड; अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता

उमेश घोंगडे 
रविवार, 13 सप्टेंबर 2020

विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महाापलिका आयुक्त विक्रमकुमार तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम हे पुण्यातील महत्वाचे व जबाबदार अधिकारी आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी राजेश देशमुख व महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भूमिका महत्वाची आहे

पुणे : पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या वाढत्या रूग्णसंख्येबाबत नाराजी व्यक्त करीत कारवाईचा इशारा दिल्यानंतर रूग्णसंख्या वाढू नये यासाठी पुन्हा लॉकडाऊन करावे का या बाबत विचार सुरू असला तरी प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये या बाबत मतभिन्नता आहे. लॉकडाऊन करून काय साध्य होणार ? असा प्रश्‍न करणारा आधिकाऱ्यांचा एक वर्ग असून त्यामुळे येत्या काळात पुण्यात खरोखरच लॉकडाऊन करण्याबाबात कोणताच निर्णय अद्याप झालेला नाही.

रूग्णसंख्या कमी करण्यासाठी थेट लॉकडाऊन करण्यापेक्षा अन्य काय उपाय करता येतील यावर प्रशासन विचार करीत असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महाापलिका आयुक्त विक्रमकुमार तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम हे पुण्यातील महत्वाचे व जबाबदार अधिकारी आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी राजेश देशमुख व महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भूमिका महत्वाची आहे.

 पुण्यात रोज दोन हजारांहून अधिक रूग्ण सापडत आहेत. पुण्यात रोजच्या तपासण्यांची संख्यादेखील वाढविण्यात येत आहे. रूग्णसंख्या आटोक्यात राहिली पाहिजे तसेच लॉकडाऊनदेखील टाळता आले पाहिजे या दुहेरी पेचात पुण्याचे प्रशासन सापडले आहे. गेल्या महिन्यात तसेच या महिन्यात आतापर्यंतची पुण्यातील रूग्णसंख्या देशात सर्वाधिक वेगाने वाढणारी असून पुणे हे देशातील सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरले आहे. गेल्या पाच महिन्यात विविध प्रकारच्या उपाययोजना करूनही रूग्णसंख्या आटोक्यात का येत नाही, असा प्रश्‍न पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत केला होता. यावरून त्यांनी अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन टाळत रूग्णसंख्या कशी कमी करायची यावर अधिकारी मार्ग शोधत आहेत.

पुन्हा लॉकडाऊन कारायचे झाल्यास व्यापऱ्यांचा मोठा विरोध पत्करावा लागणार आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीला जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडाऊन केले होते. मात्र, त्यावेळीदेखील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. सध्या अनलॉकची स्थिती असली तरी आजही अनेक निर्बंध आहेत. सध्या जे निर्बंध आहेत ते उठविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून याआधीच करण्यात आली आहे. ते उठविण्याऐवजी पुन्हा लॉकडाऊन करणे प्रशासनाच्या दृष्टीनेदेखील अवघड बाब आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख