तुम्ही मला एक आमदार द्या; मी ह्यांचा कार्यक्रमच करून दाखवतो - Devendra Fadnavis's comment on the change of power in the state again in Pandharpur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

तुम्ही मला एक आमदार द्या; मी ह्यांचा कार्यक्रमच करून दाखवतो

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

बेईमानाने तयार झालेले हे सरकार सातत्याने शेतकऱ्यांशी बेईमानी करत आहे.

पंढरपूर : ‘‘पंढरपूरच्या पोटनिवडणकीत तुम्ही महाविकास आघाडीचा कार्यक्रम करा; मी राज्यात यांचा कार्यक्रम करून दाखवतो. समाधान आवताडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिला, तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी केलाच म्हणून समजा,’’ अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताबदलावर पुन्हा एकदा भाष्य केले.

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारनिमित्त पंढरपुरात सोमवारी (ता. १२ एप्रिल) देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्यात त्यांनी वरील भाष्य केले.

ही निवडणूक एका मतदारसंघापुरती असली तरी महाराष्ट्रात ही निवडणूक एक आचार, विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे. एका मतदारसंघातील निवडणूक जिंकली काय आणि हारले काय. त्याने काय फरक पडणार आहे. याने सरकार थोड बदलते. त्यावर मी त्यांना सांगितले की सरकार बदलायचे असेल तर आम्हाला निवडणुकीची गरज नाही. जेव्हा बदलायचे असेल, तेव्हा सरकारही बदलून दाखवू, अशा शब्दांत फडणवीस यांनी आव्हान दिले. 

ही निवडणूक आज याचसाठी महत्त्वाची आहे की, लोकशाहीत सरकारचा अनाचार, दुराचार अत्याचार आणि भ्रष्टाचार वाढल्यानंतर अशा सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मतांचा अधिकार सर्वात महत्वाचा असतो. या जुलमी सरकारच्या विरोधात सर्वात प्रथम मतदान करण्याचा अधिकार पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या नागरिकांना या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

राज्यातील सरकार हे तर बेईमानेने तयार झालेले आहे. पण सत्तेवर आल्यानंतर सर्वसामान्य जनतेशीही हे सरकार बेईमानी करत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले, मात्र, कोणाचीही कर्जमाफी केली नाही. जे इमानदारीने कर्ज भरतात, त्यांना ५० हजार रुपये देऊ, पण त्यांना फुटकी कवडी दिली नाही. बेईमानाने तयार झालेले हे सरकार सातत्याने शेतकऱ्यांशी बेईमानी करत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दुकानदार अडचणीत आहेत. शेजारील राज्यांनी पॅकेज दिले. मात्र, देशातील सर्वात समृद्ध राज्य असूनही सरकारने आमच्या जनतेला फुटकी कवडीही दिली नाही. सुलतानी, मोगली वसुली मात्र या सरकारने सुरू केली.  लॉकडाउनमध्ये दुप्पट वीजबिल दिले आणि त्याची वसुली केली. आम्ही अधिवेशनात या वीज कनेक्शन तोडणीच्या विरोधात आवाज उठवला. त्यावेळी अजित पवार यांनी राणाभीमदेवी थाटात कनेक्शन कापण्यास स्थगिती देतो, अशी घोषणा केली. आम्हाला वाटलं एवढ्या मोठ्या नेत्याने स्थगितीची घोषणा केली आहे. त्यामुळे कोणाचेही कनेक्शन कापले जाणार नाही. पण लाबडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही. कारण, अधिवेशानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वीज कनेक्शन तोडण्यावरील स्थगिती उठवल्याची घोषणा केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख