'सामना'च्या कार्यालयात नव्हे, ईडी आॅफिसमध्ये जा : सरनाईकांना फडणवीसांचा 'सल्ला' - Devendra Fadanavis Advised Pratap Sarnaik | Politics Marathi News - Sarkarnama

'सामना'च्या कार्यालयात नव्हे, ईडी आॅफिसमध्ये जा : सरनाईकांना फडणवीसांचा 'सल्ला'

उमेश घोंगडे
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई सुरू केल्यानंतर चौकशीला आव्हान देण्यापेक्षा आमदार प्रताप सरनाईक यांनी चौकशीला सामोरे जायला हवे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फठडणवीस यांनी मांडली. 'सामना'च्या कार्यालयात जाणे किंवा माध्यमांना मुलाखती देण्यापेक्षा त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे, असे फडणवीस यांनी सांगितले.

पुणे : सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई सुरू केल्यानंतर चौकशीला आव्हान देण्यापेक्षा आमदार प्रताप सरनाईक यांनी चौकशीला सामोरे जायला हवे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फठडणवीस यांनी मांडली. 'सामना'च्या कार्यालयात जाणे किंवा माध्यमांना मुलाखती देण्यापेक्षा त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे, असे फडणवीस यांनी सांगितले.

कोणतीही यंत्रणा सबळ पुरावे असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीची चौकशी करीत नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "एखाद्या यंत्रणेला तपास करावयाचा झाल्यास त्यांची पूर्व तयारी केलेली असते.चौकशी करण्याइतके सबळ पुरावे त्यांच्याकडे असतात. त्यामुळे अशी चौकशी सुरू झाल्यानंतर त्याला विरोध करण्यापेक्षा चौकशीला सामोरे जावे. चौकशीतून सत्य बाहेर येईलच, अशी भूमिका असायला हवी. आमदार सरनाईक यांनीही अशी भूमिका घ्यायला हवी. मुळात अशी कारवाई होताना प्रांतीक, मराठी-अमराठी असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. कुणी असा प्रयत्न केलाच तर महाराष्ट्रातील जनता योग्य ते समजून घ्यायला सक्षम आहे. मुळात महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची मक्तेदारी केवळ आपली आहे, असे कुणी समजण्याचे कारण नाही. अशी मक्तेदारी महाराष्ट्रातील जनतेने कुणा एका पक्षाला दिलेली नाही.''

अजित पवार यांनी गेल्या काही दिवसात भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. त्यावर बोलताना फडणवीस यांनी पवार यांच्यावर थेट टीका करण्याचे टाळले. ते म्हणाले, "पवार यांनी जरी टीका केली तरी त्यांचे नेमके दुखणे काय आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्यावर आता न बोलता योग्यवेळी मी बोलेन.'' राज्य सरकार पडण्यासाठी कुणीही प्रयत्न करण्याची गरज नाही. मुळात हे सरकार अनैसर्गिक आहे. त्यामुळे सरकार कधी जाईल याची चिंता करण्याचे कारण नाही. योग्यवेळी हे सरकार त्यांच्याच कर्माने जाणार असून त्यानंतर आम्ही सक्षम पर्याय म्हणून पुढे येऊ''

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या वीज आंदोलनाची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचा संदर्भ देऊन फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''राज्य सरकारने आमच्या आंदोलनाची या प्रकारे किमान दखल घेतल्याचा आनंद आहे. सरकार मनमानी करणार, जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करणार. अगदी कोरानाच्या काळातही भ्रष्टाचर करणार आम्ही ते शांतपणे बघत राहावे, अशी त्यांची अपेक्षा असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही.''
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख