निवडणुकीत पॅनेल हरूनही शिक्रापुरात सरपंच बांदल गटाचाच होणार - Despite the defeat of the panel in the election, the Sarpanch Bandal group will remain in Shikrapur | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणुकीत पॅनेल हरूनही शिक्रापुरात सरपंच बांदल गटाचाच होणार

भरत पचंगे 
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

बांदलांच्या पुतण्यासह त्यांचे खंदे समर्थक रामभाऊ सासवडे यांचा पराभव करून ही निवडणूक 9 : 7 अशी जिंकली होती.

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्‍यातील शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या 17 सदस्यांच्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांची 9 : 7 अशी पिछेहाट झाली होती. पण, बांदलांच्या मदतीला औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आला आणि त्यांच्याच गटाचे रमेश गडदे यांचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे निवडणुकीत काहीही झालेले असले तरी शिक्रापूर ग्रामपंचायतीवर अखेर बांदल गटाचाच झेंडा फडकणार, हे निश्‍चित झाले. कारण, अनुसुचित जातीच्या आरक्षणानुसार रमेश गडदे हे एकमेव नवनिर्वाचित सदस्य हे बांदल गटाचे असून बांदल गट निवडणुकीत हरूनही सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारून गेला आहे. 

माजी सरपंच बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, सोमनाथ भुजबळ, अरुण करंजे यांनी माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकून बांदलांच्या पुतण्यासह त्यांचे खंदे समर्थक रामभाऊ सासवडे यांचा पराभव करून ही निवडणूक 9 : 7 अशी जिंकली होती.

एक उमेदवार बिनविरोध असल्याने तो कुणाकडेही जाण्याची शक्‍यता गृहीत धरली तरी ग्रामपंचायतीवर बांदल यांच्या विरोधी गटाचीच सत्ता येणार, असे चित्र होते. मात्र सरकारने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या सरपंचपदाच्या आरक्षणाला स्थगित करुन आरक्षण सोडती पुन्हा काढण्याचे निश्‍चित केले होते. 

दरम्यानच्या काळात औरंगाबाद खंडपीठापुढे अनुसुचित जाती-जमातीची पडलेली आरक्षणे तशीच ठेवावीत. इतर आरक्षणे पुन्हा करावीत, असा आदेश एका याचिकेवरील निर्णयानुसार खंडपीठाने दिला आणि याच निर्णयानुसार सरकारला कार्यवाही करणे आज भाग पडले. त्यामुळे आज शिरूर तालुक्‍यातील 71 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडत कार्यक्रमावेळी शिक्रापूरचे आरक्षण पूर्वी ठरल्याप्रमाणे कायम राहील, असे जाहीर करण्यात आले आणि शिक्रापुरात रमेश गडदे हे बांदल गटाचे सरपंच होणार, हे निश्‍चित झाले. 

अर्थात या आरक्षणाचा सदस्य विरोधी गटाकडे नसल्याने आणि गडदे हे बांदल गटाच्या पॅनेलकडून निवडून आल्याने औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाची बाब बांदल गटाच्या पथ्यावर पडून शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीत आणखी एक ट्‌विस्ट अनुभवायला मिळाला. 

नियती आमच्यासोबत 

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी वार्ड नंबर 1 मध्ये मी स्वत: तसेच माजी सरपंच जयश्री भुजबळ यांना हरविण्यासाठी तब्बल तीनशे मतदार वार्ड नंबर 2 मध्ये टाकण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर केला गेला आणि आमला पराभव पत्करावा लागला. ही बाब निवडणूक आयोगापर्यंत आम्ही नेलेली असून त्याबाबत कायदेशीर मार्गाने आम्ही जाणार आहोत. मात्र, नियती कसा न्याय देते, त्याचा अनुभव आम्ही आजच्या सोडतीने घेतला असून विरोधकांना नियतीने कशी चपराक दिली ते त्यांनीच आता पहावे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख