पुणे जिल्हा कोरोना वृत्त : जावयाचा दोन तालुक्यांना प्रसाद; शिरूरमध्ये दुकाने सुरू, दौंडमध्ये आठ बाधित

पुणे जिल्ह्यातील कोरोनाविषयक प्रमुख घडामोडींचे संकलन
corona 11
corona 11

शिरूर : सोशल डिस्टन्सिंग, मास्कची सक्ती, दुकानाच्या दारातच सॅनिटायझिंग आणि आरोग्यविषयक अटी-शर्तींसह गुरुवारपासून (ता. 21) दुकाने सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली.

आमदार ऍड. अशोक पवार, नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील कापड, किराणा, मेडिकल व इतर दुकानदारांच्या बैठकीत चर्चा झाली. येथील बाजारपेठ तीन तालुक्‍यांची असून ती खुली करण्याबाबत व्यापारी प्रतिनिधींनी आग्रही मते मांडली.

जावयामुळे शिरकाव

मंचर/टाकळी हाजी : मुंबईहून आंबेगाव तालुक्‍यातील साकोरे येथे आलेल्या पती-पत्नीपैकी पतीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दरम्यान, कोरोनाबाधित व्यक्ती कवठे यमाई (ता. शिरूर) येथील जावई असून तेथे देखील तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये त्याची मुलगी व सासू-सासऱ्यांचा समावेश आहे. यामुळे आंबेगाव व शिरूर तालुक्‍यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

साकोरेतील कोरोनाबाधित व्यक्ती पत्नी, दोन मुली, सासू-सासरे व मेहुण्यासह मुंबईत वास्तव्यास आहे. मेहुण्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याने आरोग्य तपासणी न करता कुटुंबीयासह गाव गाठले. सासू, सासरे व दोन मुलींना त्याने शुक्रवारी (ता.15) कवठे यमाई येथे सोडले आणि तो पत्नीसह आपल्या मूळगावी साकोरे येथे निघून गेला. कवठे यमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी मुंबईहून आलेल्या चौघांची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या सासऱ्याने मुंबईत असलेल्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. त्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चौघांनाही तपासणीसाठी पुण्याला पाठविले. यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे डॉ. कट्टीमनी यांनी सांगितले. दरम्यान, या चौघांना कवठे यमाई येथे सोडून साकोरे येथे गेलेल्या दोघांबाबत शिरूरच्या प्रशासनाने आंबेगावच्या प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर या पती-पत्नीला तपासणीसाठी पुण्याला पाठविले आले. त्यातील पतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
...तर अनर्थ टळला असता
साकोरेतील व्यक्तीने गावी येण्या ऐवजी मुंबईतच सर्वांची वैद्यकीय तपासणी करून घेतली असती, तर पुढील अनर्थ टळला असता आणि आंबेगाव तालुक्‍यात होणारा शिरकाव थांबला असता. दरम्यान, साकोरे गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून परिसर "सील' करण्यात आला आहे.

दौंडमध्ये आठ जणांना बाधा

दौंड येथे इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) सहा पोलिस व बाधित व्यक्तीच्या संपर्कातील दोन महिला, असे एकूण आठ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तालुक्‍यात 20 दिवसांत पहिल्यांदा महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी याबाबत माहिती दिली. बाधितांमध्ये मुंबई येथे बंदोबस्त पूर्ण करून आलेले आयआरबीचे 25 ते 30 वयोगटातील सहा पोलिस आहेत. तर 16 मे रोजी बाधा झालेल्या 82 वर्षीय व्यक्ती यांची 75 वर्षीय पत्नी आणि 20 वर्षीय नात, असे एकूण आठ जणांचा समावेश आहे.

बारामतीचे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु......

बारामती : कोरोनावर मात करण्यासाठी तालुक्यासाठीचे कोविड हेल्थ सेंटर आजपासून कार्यान्वित झाले. कोरोनाची तपासणी व उपचार दोन्हीही बारामतीत व्हावेत, त्या साठी पुण्याला जावे लागू नये, या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा केला होता. अवघ्या पंधरवड्यात सर्व बाबींची पूर्तता करुन बारामती एमआयडीसीतील रुई ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर पूर्ण वेळ कोविड हेल्थ सेंटरमध्ये करण्यात आले आहे.

बारामती शहर व तालुक्यातील ज्यांना आपल्याला कोरोनासदृश त्रास होतो आहे त्यांनी आता या पुढील काळात फक्त रुई ग्रामीण रुग्णालयातच जायचे आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागात सहा बेडची व्यवस्था असून आयसोलेशनसाठी 16 तर कोरोना संशयितांसाठी आठ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यातही स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

हे सेंटर अद्ययावत व्हावे या साठी येथे सेंट्रलाईज्ड ऑक्सिजन पाईपलाईनही सज्ज झाली आहे. कोरोना रुग्णांबाबत व्यवस्थित माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने एका कंट्रोलरुमची स्थापना करण्यात आल्याची माहिती रुई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील दराडे यांनी दिली.

ज्यांना सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, दम लागणे व अंगदुखी असेल त्यांनी तातडीने रुईच्या रुग्णालयात तपासणी साठी जायचे आहे. ज्यांची लक्षणे कोरोनासदृश असतील त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने घेऊन ते लगेचच एमआयडीसीतील मेडीकल कॉलेजमधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेला रुग्ण असेल तर त्याला तेथेच दाखल करुन घेतले जाणार आहे, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांनी सांगितले.

दरम्यान वरिल लक्षणाखेरीज इतर लक्षणे असलेला रुग्ण असेल तर त्यांनी बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात जायचे आहे तर गरोदर मातांनी एमआयडीसीतील महिला ग्रामीण रुग्णालयात जायचे असल्याचे डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले. रुई ग्रामीण रुग्णालयात वरील लक्षणांखेरीजच्या इतर रुग्णांनी जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com