सेस काय तुमच्या बापाची पेंड आहे काय? : चंद्रकांत पाटील  - Chandrakant Patil's criticism of NCP from the cess in the market committee | Politics Marathi News - Sarkarnama

सेस काय तुमच्या बापाची पेंड आहे काय? : चंद्रकांत पाटील 

रमेश वत्रे 
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सेस, एफआरपी, हेक्‍टर हे काही कळत नाही, पण खुर्ची टिकवणे कळते.

केडगाव (जि. पुणे) : "बाजार समित्यांना सेस गोळा करता येणार नाही, अशी तरतूद केंद्र सरकारने नवीन कृषी कायद्यात केली आहे. मात्र, बारामती बाजार समितीने पत्रक काढून सेस गोळा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अरे सेस काय तुमच्या बापाची पेंड आहे. सेसचा मलिदा खायदा मिळणार नसल्याने विरोधकांची तडफड चालू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुर्ची टिकवण्यासाठी या कायद्याला विरोध करत आहेत. त्यांना सेस, एफआरपी, हेक्‍टर हे काही कळत नाही, पण खुर्ची टिकवणे कळते,' अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. 

भारतीय जनता पक्षाने बळिराजा सन्मान व ट्रॅक्‍टर पूजनच्या राज्यव्यापी रॅलीचा समारोप आज (ता. 11 ऑक्‍टोबर) चौफुला (ता. दौंड, जि. पुणे) येथे करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, मकरंद कोरडे, संजय थोरात, दादा पाटील फराटे, नामदेव बारवकर, जालिंदर कामठे उपस्थित होते. 

किसान मोर्चाने रॅलीचे आयोजन केले होते. मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व संयोजक वासुदेव काळे, तालुकाध्यक्ष ज्ञानदेव ताकवणे यांनी स्वागत केले. अंकुश शेंडगे व अंकिता बारवकर या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. रॅलीत 160 ट्रॅक्‍टरसह शेतकरी सहभागी झाले होते. 

पाटील म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचे कायदे केल्याने त्यांना धन्यवाद देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जादा पैसे मिळावेत, असे विरोधकांना वाटत नाही. या कायद्यामुळे दलाल, ठेकेदार, व्यापारी यांची गोची झाली आहे आणि त्यांचे नेतृत्व कॉंग्रेस व त्यांचे मित्र पक्ष करीत आहेत. राज्याने या कृषी विधेयकाला स्थगिती दिली आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयात ही स्थगिती टिकणार नाही.' 

माजी मंत्री अनिल बोंडे म्हणाले, कृषी कायद्यामुळे दलालांची अडचण झाली आहे. शेतकऱ्यांना कायदा समजला पण या गाढवांना कायदा कळेना. कॉंग्रेसने हे कृषी विधेयक आणू असे 2019 मधील निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केलेले आहे. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले, केंद्राने केलेल्या कायद्यांना राज्याला स्थगिती देता येत नाही. कृषी कायद्याने शेतकऱ्यांचे भले होणार आहे. मात्र विरोधासाठी विरोध केला जात आहे. 

राहुल कुल यांनी अष्टविनायक मार्ग, बेबी कालवा, भामा आसखेड, कालव्याचे आवर्तन, वीज कामाबाबत माहिती देत कृषी विधेयकाचे समर्थन केले. वासुदेव काळे यांनी प्रास्ताविक केले. भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव ताकवणे यांनी आभार मानले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख