पुणे : महाविकास आघाडी सरकारने माझी आणि काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा हटवली आहे. त्यासाठी सरकारचे आभार! आमच्या काढून घेतलेल्या सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा विशेष कार्यभार द्यावा, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कपात तर काहींची वाढवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली असून मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी व मुलीची सुरक्षा व्यवस्था घटविण्यात आली आहे. चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, राम कदम यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे.
हे देखिल वाचा -
वरुण सरदेसाईंवर झाले सरकार मेहेरबान
फडणवीसांची बुलेटप्रूफ गाडी काढली
नारायण राणेंची सुरक्षा हटवली, तर राज ठाकरेंची घटवली!
याबाबत बोलताना पाटील म्हणाले ''राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. जोपर्यंत राज्यातील कायदा व सुव्यवस्था ठीक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही. आम्हा सर्वांच्या सुरक्षा ताफ्यातून ज्या पोलिस जवानांना वगळण्यात आले आहे, त्यांना महिला सुरक्षेचा विशेष कार्यभार देऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे,''
''सुरक्षेची खरी गरज लोकप्रतिनिधींना नसून जनतेला आणि महिलांनाच आहे. पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षा कवच आहेत. त्यामुळे आमची काळजी न करता राज्यातील सुव्यवस्था नीट रहावी, याकडे राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. पत्रकार आणि राज्य सरकार यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारचे वाभाडे निघत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची उर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी, अशी अपेक्षा करतो,'' असेही पाटील यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

