सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री चालतील का...? चंद्रकांत पाटील म्हणतात... 

जी महिला मुख्यमंत्री होईल, तिचा नवराच राज्य चालवणार असेल, तर ती मुख्यमंत्री होऊन काय करायची?
सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री चालतील का...? चंद्रकांत पाटील म्हणतात... 
Chandrakant Patil says about Supriya Sule's Chief Minister's post

पुणे : "कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी,' अशी अपेक्षा भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली होती. त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या तर चालतील का? असा प्रश्‍न विचारला असता, ते म्हणाले, ""कर्तृत्ववान महिला, जिचा क्‍लेम आहे, अशा महिलेचा प्रस्ताव कुणालाही मान्य होईल.'' 

"ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन'तर्फे पुण्यात आयोजित नवदुर्गा सम्मान सोहळ्यात आमदार पाटील बोलत होते. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. "कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी,' अशी अपेक्षा भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली होती. 

तोच संदर्भ घेत चंद्रकांतदादा म्हणाले की, राज्यात महिला मुख्यमंत्री होण्यास माझा विरोध नाही. उलट आमचाही त्याला पाठिंबाच आहे. पण, जी महिला मुख्यमंत्री होईल, तिचा नवराच राज्य चालवणार असेल, तर ती मुख्यमंत्री होऊन काय करायची? महिला मुख्यमंत्री होण्याबरोबरच तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलण्याची गरज आहे. 

राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायलाच हवी. मात्र, महिला सरपंचासारखं महिला मुख्यमंत्र्यांचे व्हायला नको. सरपंच महिला झाली आणि गाव नवरा चालवतो, अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको, अशी टिप्पणीही त्यांनी केली. खासदार सुळे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या तर चालतील का? यावर "कर्तृत्ववान महिला, जिचा क्‍लेम आहे, अशा महिलेचा प्रस्ताव कुणालाही मान्य होईल,' असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 


काय म्हणाले होते आशिष शेलार? 

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे संपादित "कर्तृत्ववान मराठा स्त्रिया" या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या समारंभाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव हे उपस्थित होते. 

महाराव यांनी समारंभास उपस्थित असेलल्या व्यक्तींचे नाव घेताना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आशिष शेलार असा उल्लेख केला. तसेच, देशाचे नेते असे शरद पवार यांना संबोधले. महारावांचे "भावी मुख्यमंत्री" असे संबोधन शेलारांनाही ते चकीत करणार ठरले. 

आपल्या भाषणात त्यांनी त्याचा उल्लेख करत चर्चा वेगळ्या पातळीवर नेली. महाराष्ट्रतील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात संशोधन होण्याची गरज आहे असं म्हणत राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

"संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं, असे त्यांनी सांगितले 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in