जयंत पाटलांना 'जपा', तर उद्धव ठाकरेंना 'उठा' म्हटले तर चालेल का? : चंद्रकांत पाटील 

उद्धव ठाकरे यांनी "सामना' ला दिलेली मुलाखत असो वा दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातील भाषा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभणारी नव्हती.
Chandrakant Patil criticizes Jayant Patil
Chandrakant Patil criticizes Jayant Patil

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या एका पक्षाचे नेतृत्व करणारे जयंत पाटील खुशाल म्हणतात की चंद्रकांत पाटील यांना "चंपा' म्हटलं तर बिघडल कुठं? याच भूमिकेतून त्यांना "जपा' म्हटले तर चालेल का? असा प्रश्‍न करीत शरद पवार यांना शपा, उद्धव ठाकरे यांना उठा असे म्हटले तर चालेल का? याचा विचारही जयंत पाटील यांनी करावा, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात म्हटले. 

वास्तविक महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या प्रकारची नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका करीत असताना स्वत:साठी काही आचारसंहिता ठरवून घेण्याची वेळ आली आहे, असेही मत पाटील यांनी व्यक्त केले. 

गेल्या काही महिन्यांत भाजप-शिवसेना तसेच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. टीका करताना बऱ्याचवेळा पातळी सोडून टीका केली जाते. या संदर्भातील मुद्दा पत्रकार परिषदेत उपस्थित केल्यानंतर पाटील यांनी ही भूमिका मांडली. पाटील यांनी सामंजस्य ठेवण्याची भूमिका मांडली. 

ते म्हणाले, "राजकारण म्हटले की मतभेद, आरोप-प्रत्यारोप होतात. मात्र, अशाप्रकारे टीका करताना सर्वच राजकीय नेत्यांनी काही भान राखले तर राजकीय वातावरण खराब होणार नाही. आपली भूमिका मांडताना संयम राखून टीका केली तर कटुता येत नाही. राजकीय वातावरण चांगले राहण्यास त्यातून मदत होते.''

उद्धव ठाकरे यांनी "सामना' ला दिलेली मुलाखत असो वा त्यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातील भाषा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभणारी नव्हती. केवळ उद्धव ठाकरे नव्हे; तर सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना आपण काय बोलतोय, याचे भान ठेवावला हवे, असे पाटील यांनी सांगितले. 

पाटील म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाल्याचे मोठ्या अभिमानाने सांगण्यात येत आहे. मात्र, या काळात सरकारने सामान्य शेतकऱ्यांसाठी काय केले? याचे उत्तर द्यायला हवे. गेल्या वर्षात पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाई मिळाली नाही. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यापलिकडे या सरकारने वर्षभरात काहीच केलेले नाही.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com