घरात बसून कामकाजाचा मुख्यमंत्र्यांचा नवा पायंडा : चंद्रकांत पाटलांची टीका - Chandrakant Patil Criticism on Uddhav Thackeray about Working From Home | Politics Marathi News - Sarkarnama

घरात बसून कामकाजाचा मुख्यमंत्र्यांचा नवा पायंडा : चंद्रकांत पाटलांची टीका

महेश जगताप
रविवार, 27 सप्टेंबर 2020

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते तर तर निश्चितच दोनशे टक्के टक्के फरक पडला असता. कारण आमच्याकडे संघटनात्मक ताकद होती. सरकारमध्ये समन्वय होता व निर्णय घेण्याची क्षमता होती. मात्र या सरकार मध्ये कोणताही समन्वय नसल्याने कोरोनाने राज्यामध्ये हाहा:कार माजवला. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले, अशी टीका चंद्रकात पाटील यांनी केली

पुणे :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात  नवीनच पायंडा पाडला आहे. घराच्या बाहेर न निघता घरात बसून राज्यातील आणीबाणीची परिस्थिती हाताळत आहेत ,अशी बोचरी टीका  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे. गेली सहा महिने ते घराबाहेरच पडले नाहीत मग या राज्याचे काय होणार .इतर नेते फिरत असताना त्यांनी असं घरात बसणं योग्य नाही, असा सल्ला पाटील यांनी ठाकरे यांनी दिला.

जे व्हायचं आहे ते होणारच आहे हे या कोरोनाच्या रोगाने शिकवले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी घराच्या  बाहेर पडलं पाहिजे, असं मत पाटील यांनी व्यक्त केले. 'सरकारनामा'शी बोलताना पाटील म्हणाले, "कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते तर तर निश्चितच दोनशे टक्के टक्के फरक पडला असता. कारण आमच्याकडे संघटनात्मक ताकद होती. सरकारमध्ये समन्वय होता व निर्णय घेण्याची क्षमता होती. मात्र या सरकार मध्ये कोणताही समन्वय नसल्याने कोरोनाने राज्यामध्ये हाहा:कार माजवला. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले,"

राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे इतर सहकारी राज्यभर फिरत असताना मुख्यमंत्री मात्र घराच्या बाहेर यायला तयार नाहीत. त्याचबरोबर राज्याचे नेते शरद पवार हे ही प्रचंड प्रमाणात फिरत आहेत.  मग ठाकरे यांना प्रॉब्लेम काय आहे, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. ठाकरे घरी बसत असले तरी काही अडचण नाही. पण त्यांनी घरी बसून तरी कमीत कमी  लोकांची काम केली पाहिजेत . फडणवीस हे रात्रंदिवस काम करत होते. रात्रीच्या तीन वाजता आम्ही निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी केली आहे, असेही पाटील म्हणाले. 

''या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण ही विषय सुप्रीम कोर्टामध्ये स्थगित झाला. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यात आम्ही कोणतीही कसूर केली नाही. त्याचा फायदा झाला. उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले. यामागे कायद्याचा अभ्यास करून प्रयत्पूर्वक केलेले काम होते. मात्र, आम्ही कष्टाने मिळविलेले आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले. आरक्षणासाठी मराठा समाजाचे आता सुरू असलेले आंदोलन स्वयंस्फूर्त आहे. त्याला आमची फूस असल्याचा सरकारचा आरोप चुकीचा असून सरकार सर्वोच्च न्यायालयात आलेले अपयश आमच्यावर आरोप करून झाकू शकत नाही.'' असेही यावेळी पाटील म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख