पंढरपुरातील भाजपच्या विजयाचे फलटणच्या नगरसेवकाला मिळाले बक्षीस - BJP's victory in Pandharpur was rewarded by a corporator in Phaltan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

पंढरपुरातील भाजपच्या विजयाचे फलटणच्या नगरसेवकाला मिळाले बक्षीस

भारत नागणे
मंगळवार, 4 मे 2021

अनुप शहा व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील दोस्ती सर्वश्रूत आहे. 

पंढरपूर  ः अत्यंत अटीतटीने आणि चुरशीने पार पडलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्यावर बाजी मारली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांचे बळ वाढले आहे. त्यातच आता पंढरपूरच्या विजयात योगदान देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचीही पक्षश्रेष्ठींनी दखल घेण्यास सुरुवात केली आहे. (BJP's victory in Pandharpur was rewarded by a corporator in Phaltan)

फलटण (जि. सातारा) येथील नगरसेवक अनुप शहा यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान केलेल्या कामाची दखल थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. त्यांच्या कामाचे बक्षीस म्हणून भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पद देण्यात आले आहे. अनुप शहा यांना राष्ट्रवादीने फलटण नगरपरिषदेत  स्वीकृत नगसेवक म्हणून संधी दिलेली आहे. तरीही अनुप शहा व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील दोस्ती सर्वश्रूत आहे. 

हेही वाचा : आमदार सुनील शेळकेंच्या त्या टीकेला बाळा भेगडेंनी दिले चोख उत्तर

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकरांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर अनुप शहा यांनी राष्ट्रवादीचा पक्षादेश झुगारुन निंबाळकरांचा प्रचार केला होता. खासदार निंबाळकरांनी शहांवर करमाळा तालुक्याची विशेष जबाबदारी दिली होती. त्यावेळी शहा यांनी ती प्रमाणिक पार पडली.

निवडणूक झाल्यानंतर अनुप शहा यांनी राष्ट्रवादीच्या लेटर पॅडवरुन  करमाळा तालुक्यातील 2500  प्रमुख भाजप पदाधिकारी  व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले होते. त्यावेळी त्यांच्या आभाराच्या लेटर पॅडची चांगलीच चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीपासून अनुप शहा हे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे पूर्णवेळ काम करत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने खासदार निंबाळकर यांच्याकडे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती. त्यांच्या या टिमध्ये नगरसेवक अनुप शहांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत खासदार निंबाळकरांसोबत राहून दिलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजप उमेदवाराने बाजी मारली. त्यानंतर आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षसंघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूरच्या निवडणुकीतील बक्षीस म्हणून अनुप शहा यांना पक्ष संघटनेत राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष इजाज देशमुख यांनी शहा यांना निवडीचे पत्रही दिले आहे.

नगरसेवक अनुप शहा यांची निवड झाल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, दिशा कमिटी सदस्य डॉ. प्रविण आगवणे, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उषा राऊत व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख