आम्ही म्हणू तोच सभापती होईल : भाजपच्या निर्णयामुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट   - BJP's decision to field a candidate for the post of Shirur Bazar Samiti chairman | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

आम्ही म्हणू तोच सभापती होईल : भाजपच्या निर्णयामुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट  

  भरत पचंगे 
गुरुवार, 8 जुलै 2021

योग्य वेळी आम्ही आमचे पत्ते उघड करु.

शिक्रापूर  (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाच्या निर्णयामुळे शिरूर बाजार समितीच्या सभापती निवडीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सभापतिदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. एवढेच नाही तर ‘आम्ही म्हणू तोच सभापती होईल,’ असा दावाही भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत शिरूर बाजार समितीचे भाजपचे संचालक राहुल गवारे यांनी तसे जाहीर केले असून पक्षाचे तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनीही या भूमिकेला दुजोरा दिला आहे.

राष्ट्रवादीमुळे शिरूर तालुका प्रांतिक मतभेदात विभागला जात असून याच्या निषेधार्थ आम्ही सभापती निवडीत निर्णायक भूमिका घेऊन तालुका एकसंध राहील, अशीच सभापती-उपसभापतींची निवड होईल, अशी रणनीतीही आखल्याचे तालुकाध्यक्ष फराटे यांनी सांगितले. (BJP's decision to field a candidate for the post of Shirur Bazar Samiti chairman)

शिरुर बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे १४ आणि भाजपचे  ४ संचालक आहेत. भाजपचे चारपैकी दोन जण राष्ट्रवादीने आपल्या जाळ्यात ओढले आहेत. अर्थात हे दोघे का व कसे ओढले गेले, त्याची कारणेही जगजाहीर आहेत. असे असूनही राष्ट्रवादीला सभापती-उपसभापती निवडीत शिरुर-आंबेगाव व शिरुर-हवेली असा मेळ घालणे सोपे गेले नाही. त्यातच दोन्ही मतदार संघातील एकेका संचालकाला प्रत्येकी एकेक वर्ष सभापती-उपसभापतीपद देण्याचेही सुरवातीला ठरल्याचे आजही बोलले जाते. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

हेही वाचा : भाजपचा खडसेंवर जुना राग; म्हणूनच त्यांच्या मागे चौकशीचा फेरा : जयंत पाटील 

बाजार समितीचे पहिले सभापती शशिकांत दसगुडे आणि उपसभापती विश्वासकाका ढमढेरे यांना तब्बल तीन वर्षे या पदावर काम करण्याची संधी मिळाली. पुढील काळात शंकर जांभळकर आणि विकास शिवले हे सभापती आणि उपसभापती झाले. पण, इतर संधी देण्याच्या नावाखाली जांभळकर-शिवले यांचा राजीनामा घेण्यात आला. सभापतीपदासाठी १० जुलै रोजी निवडणूक होत आहे.

या पार्श्वभूमीवर आंबेगाव मतदारसंघाला जोडलेल्या ३९ गावांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांची विभागीय अस्मिता जागी झाली. त्यामुळे आगामी वर्षभरासाठी सभापतीपद आंबेगावला जोडलेल्या गावांत द्यायचे की शिरुर मतदारसंघात ठेवायचे, असा पेच राष्ट्रवादीपुढे उभा आहे. हे सर्व हेरून आता भाजपही सक्रीय झाला आहे. राष्ट्रवादीच्या प्रांतिक मतभेदात आपली पोळी भाजण्यासाठी भाजप नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.

यासंदर्भात शिरूर बाजार समिती संचालक राहुल गवारे यांनी सांगितले की, ठीक आहे, आमचे दोन संचालक त्यांनी (राष्ट्रवादीने) पळविले; म्हणून राष्ट्रवादी म्हणेल तोच सभापती होईल, अशी सध्या स्थिती नाही. आम्हीही आता या निवडणुकीत उतरत असून योग्य वेळी आम्ही आमचे पत्ते उघड करु. कुणी म्हणेल, उमेदवारीसाठी आम्हाला सूचक-अनुमोदक नाहीत. पण, प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर राष्ट्रवादीला समजेल आम्ही म्हणू तोच कसा सभापती होतोय ते. 

दरम्यान, याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे म्हणाले की, लोकसभेत कधीकाळी दोनच खासदार असलेला आणि देशातील सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचे देश जाणतो. त्यामुळे शिरूर बाजार समितीत आमच्याकडेही दोनच संचालक असले तरी आम्ही शिरुर बाजार समितीचा सभापती ठरवू. 

ती गोष्ट वळसे पाटलांच्या लक्षात आणून देऊ  ः फराटे

विधानसभा व लोकसभा या दोनच निवडणुकांसाठी शिरुर-आंबेगाव व शिरुर-हवेली असे दोन मतदार संघ झालेले असताना तालुक्यातील इतर सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी एकत्रपणे लढते. पदाधिकाऱ्यांच्या निवडीत मात्र शिरूर आणि आंबेगावमध्ये कुरघोडीचे राजकारण होत आहे. यातून तालुक्याचे दोन तुकडे पाडले जात आहेत. आम्ही तालुक्याचे असे दोन तुकडे कधीही सहन करणार नाही. याबाबत वेळ पडल्यास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही ही बाब पक्षीय मतभेद दूर ठेवून लक्षात आणून देणार आहोत, असे दादापाटील फराटे यांनी सांगितले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख