भाजपच्या नेटक्‍या रणनीतीने राष्ट्रवादीला झुंजविले 

अनेक गावांतून पैशांचा खणखणाट झाल्याने पाच हजार ते अखेरच्या टप्प्यात तब्बल 25 हजारांपर्यंत मताला भाव गेल्याची चर्चा होती.
BJP-NCP claims victory in Shirur Gram Panchayat elections
BJP-NCP claims victory in Shirur Gram Panchayat elections

शिरूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. 15 जानेवारी) अत्यंत चुरशीने मतदान झाले. "गावकारभारी' होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे नशिब मतदान यंत्रांत बंद झाल्यानंतर आता परस्पर विजयाचे दावे सुरू झाले आहेत. "गुलाल आमचाच'...बाजी आम्हीच मारणार... असे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी विजयाबाबत पैजादेखील लागल्या आहेत. 

राज्यात सत्तेत एकत्र असलेले राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेनेचे शिरूर तालुक्‍यात मात्र सूत न जमल्याने महाआघाडीत निवडणुकीपूर्वीच बिघाडी झाली होती. त्यामुळे काही कट्टर शिवसैनिकांनी स्वाभिमानाचा भगवा फडकावत स्वतंत्रपणे ताकद अजमावली. तालुक्‍यात सर्वाधिक ताकदवान असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात अनेक गावांत भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी कस लावला होता. भाजप पदाधिकाऱ्यांनी नेटके नियोजन करून लढत दिल्याने राष्ट्रवादी समर्थक उमेदवारांना भाजपच्या रणनीतीसमोर चांगलेच झुंजावे लागल्याचे काही ठिकाणचे चित्र आहे. अनेक गावांत पक्षातीत निवडणुका होऊन पक्षीय पातळीवर कट्टर राजकीय विरोधक असलेले खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले. काही गावांत चक्क राष्ट्रवादीच्याच दोन गटांत तुंबळ राजकीय युद्ध रंगल्याचे दिसले. 

तालुक्‍यातील 71 ग्रामपंचायतींपैकी आपटी, पिंपरखेड, हिवरे, डिंग्रजवाडी, मोटेवाडी, आमदाबाद, सादलगाव, खैरेनगर व वाडा पुनवर्सन गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 62 ग्रामपंचायतींच्या 516 जागांसाठी चुरशीने मतदान झाले. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे होऊ लागल्याने मतदानानंतर गावोगावचे राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. 

एकूण एक हजार 162 उमेदवार रिंगणात असलेल्या 62 गावांत मिळून 83 टक्के मतदान झाले. गावकी आणि भावकीभोवती फिरणाऱ्या या निवडणुकीत या वेळी मात्र अनेक घटकांचा सहभाग दिसून आला. बाहेरचे मतदान निर्णायकी ठरत असल्याने त्या कौलावरही अनेक ठिकाणचे निकाल अवलंबून आहेत. 

या निवडणुकीत तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, कोरेगाव भीमा, आलेगाव पागा, न्हावरे, कारेगाव, या मोठ्या गावांबरोबरच; अनेक छोट्या गावांमध्येही कमालीची चुरस दिसून आली.

रांजणगाव गणपती, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा या पट्ट्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होऊन स्थानिक विकासालाही चालना मिळाली आहे. रोजगार निर्मितीबरोबरच; स्थानिक उद्योगधंदेही भरभराटीस लागल्याने अनेकांच्या हातात पैसे खुळखूळू लागले आहेत. त्याचा परिणाम या निवडणूकांतील चूरशीतूनही स्पष्टपणे दिसून आला. वैयक्तिक प्रतिष्ठा आणि गावपातळीवरील इज्जत वाढविण्याच्या अहमहमिकेतून अनेक युवाशक्ती एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. 

"कॉंटे की टक्कर' असलेल्या अनेक गावांतून पैशांचा खणखणाट झाल्याने पाच हजार ते अखेरच्या टप्प्यात तब्बल 25 हजारांपर्यंत मताला भाव गेल्याची चर्चा होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com