सांगलीतील 'करेक्‍ट कार्यक्रमा'च्या परतफेडीची वेळ आली अन्‌ स्थगितीचे पत्र आले 

सभापती निवडीत काही धोका होऊ नये; म्हणूनभाजप आमदार विजयकुमार देशमुख हे विधीमंडळाचे अधिवेशन सोडून दोन दिवसांपूर्वीच सोलापुरात दाखल झाले.
BJP accuses Mahavikas Aghadi over postponement of Solapur Municipal Corporation Standing Committee election
BJP accuses Mahavikas Aghadi over postponement of Solapur Municipal Corporation Standing Committee election

सोलापूर : सांगली महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महापौर आणि उपमहापौर झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या "करेक्‍ट कार्यक्रमा'ची महाराष्ट्रभर चर्चा झाली. सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा शनिवारी (ता. 6 मार्च) करेक्‍ट कार्यक्रम निश्‍चित होता. न्यायालयात दाद मिळेना, निवडणुकीत विजयी होण्याची आशा दिसेना म्हणून महाविकास आघाडी सरकारने सत्तेच्या जोरावर निवडच लांबणीवर टाकली आणि निवडणुकीतून पळ काढल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते करू लागले आहेत. 

सोलापूर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असतानाही सभापती निवडीत काही धोका होऊ नये; म्हणून भाजपच्या वतीने कमालीची खबरदारी घेण्यात आली. माजी मंत्री, भाजप आमदार विजयकुमार देशमुख हे विधीमंडळाचे अधिवेशन सोडून दोन दिवसांपूर्वीच सोलापुरात दाखल झाले. अधिवेशन सोडून सोलापुरात येण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खास परवानगीही काढली. "स्थायी समिती सभापतीच्या निवडीत तुम्ही जरा लक्ष घाला, आपलाच सभापती करा,' अशी सूचनाही फडणवीस यांनी केली. बहुमत असूनही सभापती निवडीपूर्वी भाजप जरा चलबिचल झाली होती. 

आमदार देशमुख सोलापुरात येताच त्यांनी आखलेल्या व्यूहरचनेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठ्या विजयाचा आत्मविश्‍वास निर्माण झाला. आमदार देशमुख यांनी सुरुवातीला नगरसेविका राजश्री कणके यांचे पती संजय कणके यांचा रुसवा दूर केला. त्यानंतर स्थायी समितीवर सदस्य असलेल्या भाजपच्या नगरसेवकांसह विरोधी पक्षातील दोन सदस्यांना आपल्यासोबत ठेवण्यात देशमुख यांच्या व्यूहरचनेला यश आले. 

सांगलीतील करेक्‍ट कार्यक्रमाची परतफेड सोलापूर भाजपकडून महाविकास आघाडीला होण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असतानाच नगरविकास विभागाचे उपसचिव स. ज. मोघे यांनी निवडणूक स्थगितीचे पत्र सोलापूरच्या महापालिका आयुक्तांना पाठविले. एमआयएमचा गटनेता कोण? हे अद्यापही स्पष्ट नसल्याने ही निवडणूक स्थगित केल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांच्यातील मतभेदाचा परिणाम स्थायी समिती सभापती निवडीवर होऊ नये, यासाठीही भाजपने विशेष काळजी घेतली होती. 

माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाच्या सदस्या मेनका राठोड यांनीही भाजपच्याच उमेदवाराला मतदान करावे, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खास निरोप पाठविला असल्याचेही आता समोर येऊ लागले आहे. 

पॉवरफुल्ल देशमुख हतबल विरोधक

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सोलापूर महापालिकेत आणि जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचे वारंवार प्रयत्न झाले. तशा चर्चाही रंगल्या. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणात आमदार विजयकुमार देशमुख हेच पॉवरफुल्ल ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महापालिकेच्या विषय समिती सभापती निवडीनंतर, स्थायी समितीच्या निवडीसाठी केलेल्या व्यूहरचनेतून आमदार देशमुखांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 

सभापती निवडीवेळी आमच्यासोबत आठ सदस्य हजर होते. निवडणूक जिथे स्थगित केली आहे. तेथूनच निवडणूक घ्या, अशी आमची मागणी आहे. गटनेता कोण असावा, याचे अधिकार हे महापौरांना आहेत. महापौरांनी याबाबत निर्णयही दिलेला आहे. तरीदेखील पराभवाच्या भीतीने विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात काहीही उपयोग होत नसल्याचे पाहून शेवटी सत्तेचा गैरवापर करून निवड लांबणीवर टाकली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आम्ही ही बाब आणून दिली आहे. त्यांनी याबद्दल विधानसभेत आवाजही उठविला आहे. 

- विजयकुमार देशमुख, आमदार 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com