पुणेकरांसाठी अलर्ट : असा वाढत गेला कोरोनाचा धोका...

पुणे शहर कोरोनामुक्त झाल्याचे समजून बिनधास्त वावरणाऱ्या पुणेकरांसाठी फेब्रुवारी महिना अलर्ट देणारा ठरला आहे.
Alert for Pune punekars Coronas threat is increasing
Alert for Pune punekars Coronas threat is increasing

पुणे : पुणे शहर कोरोनामुक्त झाल्याचे समजून बिनधास्त वावरणाऱ्या पुणेकरांसाठी फेब्रुवारी महिना अलर्ट देणारा ठरला आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ तेच दर्शविते. जवळपास अडीच महिन्यांनंतर पुण्यात परवा एकाच दिवसांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मागील काही दिवसांतील रुग्णवाढीचा वेगही वाढल्याने पुणेकरांची चिंताही वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने सोमवारपासून निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण ९ मार्चला पुण्यात आढळून आला होता. काही दिवसांत त्याला एक वर्ष पुर्ण होतील. अॉक्टोबर एका दिवसांत दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांचा आकडा पार केलेल्या पुण्यात अॉक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होत गेली. दिवाळीनंतर पुन्हा आकडा वाढू लागल्याचे दिसले. पण नंतर त्यात सातत्याने घट होत गेली. तर २५ जानेवारीला हा आकडा केवळ ९८ वर आला. या आकड्यांनी पुणेकर बिनधास्त झाले. पण मागील आठवडाभरात वाढलेली रुग्णसंख्या पुणेकरांसाठी धोक्याचा इशारा देणारी आहे. 

अशी झाली वाढ...
पुण्यात २८ नोव्हेंबर ५२८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत कमालीची घट होत गेली. दैनंदिन रुग्णसंख्या २०० ते ३०० च्या जवळपास होती. जानेवारी महिन्यात सुरूवातीचे काही दिवस हा आकडा ३०० ते ४०० वर पोहचला. पण नंतर पुन्हा त्यात घट होऊन १५० ते २५० पर्यंत स्थिरावला. या कालावधीतील पॉझिटिव्हिटी रेटही १० टक्क्यांच्या खाली राहिला. मृतांचा आकडाही कमी झाला. १० फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसून आली आहे. मागील १० दिवसांतील चार दिवसांत दररोज ४०० हून अधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. तर मागील अडीच महिन्यांतील एका दिवसांतील सर्वाधिक रुग्ण १९ फेब्रुवारीला आढळून आले. यादिवशी ५२७ नवे रुग्ण आढळले. 

निर्बंध शिथील केले अन्...

रुग्णसंख्या कमी होत गेल्यानंतर प्रशासनाने लॉकडाऊनचे निर्बंध कमी करत नेले. हॉटेल, शाळा, महाविद्यालये सुरू झाली. मंदीरे उघडण्यात आली. काही उद्यानेही खुली करण्यात आली. लग्न समारंभ, विविध कार्यक्रमांना परवानगी मिळाली. प्रशासनाने याठिकाणांवर गर्दी न करण्याची, मास्क वापरण्याची अट घातली आहे. पण या नियमांचे पालनच होताना दिसत नाही. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशांची तोबा गर्दी असते. अनेक जण मास्क न लावता बिनदिक्कतपणे फिरताना दिसतात. कोरोनाच्या नियमांबाबत निष्काळजीपणामुळेच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. 

पॉझिटिव्हिटी रेट अजूनही १८ टक्क्यांच्या पुढे...

एकुण चाचण्यांच्या तुलनेत एकुण बाधित रुग्णांच्या प्रमाणाला पॉझिटिव्हिटी रेट म्हणतात. पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट अजूनही १८ टक्क्यांच्या पुढेच आहे. मागील दोन-अडीच महिन्यांत रुग्णसंख्या कमी झाली असली तरी चाचण्यांचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे हा दर अद्याप धोक्याच्या पातळीवरच आहे. अॉक्टोबर महिन्यामध्ये हे प्रमाण २० टक्क्यांच्या पुढे होते. 

काय सांगतात आकडे... ता. २० फेब्रुवारी...
उपचार सुरु असलेले रुग्ण : २,५६१
नवे रुग्ण : ४१४ 
कोरोनामुक्त : २४७ 
चाचण्या : ४,६३४
मृत्यू : ५ 
एकुण रुग्ण : १,९७,३३०
एकुण कोरोनामुक्त : १,८९,९४८
एकुण चाचण्या : १०,९४,४२७
एकुण मृत्यू : ४,८२१

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com