अजितदादांचे दोन जाहीर पण खरे ठरले : एकाला सांगून पाडला...दुसऱ्याला ठोकून आमदार केले!

राजकारणात जाहीरपणे एखाद्याच्या पराभवाबद्दल किंवा विजयाबद्दल बोलणे धाडसाचे असते. ते धाडस अजितदादांनी केले होते..
amol mitkari, Ajit Pawar, Vijay Shivtare
amol mitkari, Ajit Pawar, Vijay Shivtare

पुणे : लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी बारामती येथील जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय शिवतारे आमदार कसे होतात? तेच बघतो, असा इशारा दिला होता. विधानसभा निवडणुकीनंतर अमोल मिटकरी यांना आमदार करणार असेही जाहीरपणे सांगितले होते. गेल्या वर्षभरात जाहीरपणे केलेले निश्‍चय अजित पवार यांनी पूर्ण केले. बोलतात ते करून दाखवतात अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असलेली प्रतिमा यामुळे अधिक झळाळून निघाली आहे.

माजी मंत्री विजय शिवतारे मूळचे राष्ट्रवादीचेच मात्र, नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता ते पवार यांचे राजकीय विरोधक बनले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून शिवतारे दोनदा निवडून आले. फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात शिवतारे यांना राज्यमंत्री करण्यात आले. पवार यांच्यावरील राजकीय टीका आणि पवारांना दिलेले राजकीय आव्हान यामुळे अजित पवार व शिवतारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप ठरलेले होते. लोकसभा निवडणुकीत बारामतीतील प्रचार सभेत बोलताना शिवतारे पुढच्यावेळी आमदार कसे होतात तेच बघतो, असे आव्हान अजित पवार यांनी दिले होते. नटबोल्ट नीट करायला पाठवतो, असे आव्हान अजितदादांनी दिले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल ज्या पद्धतीने शिवतारे वक्तव्य करतात याबाबत अजित पवार यांचा शिवतारे यांच्यावर राग होता.

लोकसभा निवडणूक झाली. सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या. विधानसभेची तयारी सुरू झाली. आघाडीच्या जागावाटपात पुरंदरची ही जागा राष्ट्रवादीकडून कॉग्रेसला देण्यात आली. संजय जगताप हे कॉंग्रेसचे उमेदवार होते. अजित पवार यांनी या निवडणुकीत जगताप यांच्यामागे अशी काही ताकद उभी केली की शिवतारे यांना ३१ हजार मतांनी पराभूत व्हावे लागले आणि पवार यांनी आपला शब्द खरा करून दाखवला.

अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीतील तसा नवा चेहरा. मात्र, लाेकसभा निवडणुकीत मिटकरी यांनी ज्या पद्धतीने प्रचारसभा गाजवल्या. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांचे मिटकरी यांच्याकडे लक्ष वेधले गेले. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बोलताना मिटकरी यांना आमदार करण्यात येईल, असे अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांनी हा शब्ददेखील खरा करून दाखवला. पक्षात अनेक ज्येष्ठ आमदार होण्यासाठी प्रयत्नात असताना तुलनेने नवख्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीत त्यामुळे संधी मिळाली.

अजित पवार यांची २००४ विधानसभा निवडणुकीतील अशीच येक आठवण आहे. त्यावेळच्या हवेली मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विलास लांडे यांच्याविरोधात लक्ष्मण जगताप बंडखोरी करण्याच्या तयारीत होते. त्या वेळी मी तुला आमदार करतो, असा शब्द अजितदादांनी जगताप यांना देऊन त्यांना बंडखोरीपासून परावृत्त केले. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसच्या चंदूकाका जगताप यांना पराभूत करून दिलेला शब्द खरा करीत लक्ष्मण जगताप यांना आमदार केले.

अजित पवार यांच्या गेल्या तीस वर्षांच्या राजकारणातील त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दलचे अनेक किस्से सांगितले जातात तसेच दिलेला शब्द ते नक्की पाळतात, अशा आठवणी देखील सांगितल्या जातात. इंदापूरमधून भरणे हेच पुन्हा आमदार होणार, भले त्यासाठी काॅंग्रेस-राष्ट्रवादी युती तुटली तरी चालेल, असे त्यांनी इंदापूरच्या सभेत सांगितले होते. तसेच झाले. काॅंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांना त्यामुळे काॅंग्रेस पक्ष सोडावा लागला. अजित पवारांनी ही जागा काॅंग्रेसला देण्यास नकार दिला. त्यामुळे इंदापुरातही त्यांनी शब्द राखला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com