खुद्द अजितदादांचाच आदेश राष्ट्रवादीने तिसऱ्यांदा डावलला  - Ajit Pawar's order was thwarted by NCP for the third time | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

खुद्द अजितदादांचाच आदेश राष्ट्रवादीने तिसऱ्यांदा डावलला 

विजय जाधव 
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्हीपच्या विरोधात काम करणाऱ्या चारही सदस्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

भोर (जि. पुणे) : कडक शिस्तीचे आणि धाडसी निर्णय घेवून तो अमलात आणणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाचे भोरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अनेकदा उल्लंघन होत आले आहे. अजित पवारांनी दिलेल्या आदेशानुसार भोर पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवड न झाल्याने पवारांचा सभापतिपदासाठीचा आदेश कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाही. याची चर्चा सध्या तालुक्‍यात सुरू आहे. सभापती निवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटबाजीही उघड झाली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्हीपच्या विरोधात काम करणाऱ्या चारही सदस्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परंतु यानंतरही पक्षाकडून त्यांच्यावर काय कारवाई होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

भोरच्या सभापतीपदाच्या यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आदेश डावलण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे 2002 मध्ये मानसिंग धुमाळ आणि 2007 मध्ये रणजित शिवतरे यांनाही सभापतिपदापासून दूर राहावे लागले होते. आता तिसऱ्या वेळीही लहू शेलार यांनादेखील सभापतिपदापासून वंचित राहावे लागले आहे. अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षाचा रस्ता धरला आहे. याची किंमतही राष्ट्रवादीला काही प्रमाणात मोजावी लागली आहे. आताही अजित पवार हे पक्षाचा आदेश न मानणाऱ्यांवर काय कारवाई करणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

भोर पंचायत समितीमध्ये सहा सदस्यांपैकी 4 सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणि कॉंग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या वेळी सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून लहू शेलार यांचे नाव आले होते. मात्र, ऐनवेळी दमयंती जाधव यांनी अर्ज भरला आणि त्याला श्रीधर केंद्रे अनुमोदक झाले. त्यामुळे जाधव या सभापती झाल्या. तत्पूर्वी 2017 मध्ये पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या मंगल बोडके सभापती झाल्या होत्या. त्यांना पक्षाने सव्वावर्षाचा कालावधी देण्यात आला होता. मात्र राजीनामा देण्यास नकार देत त्या अडीच वर्षे सभापतिपदावर कायम राहिल्या. 

अजितदादांच्या बैठकीत काय ठरले होते? 

दरम्यान, बोडके यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांच्यासमवेत सभापतिपदाबाबत एक बैठक झाली होती. त्यात उर्वरित अडीच वर्षातील सव्वा वर्षे श्रीधर किंद्रे यांना, सव्वा वर्षे लहू शेलार यांना सभापतीपद देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार किंद्रे सभापती, तर दमयंती जाधव उपसभापती झाल्या होत्या. 

बड्या पदाधिकाऱ्याच्या सहकार्याची चर्चा 

श्रीधर किंद्रे यांनीही काही घडामोडीनंतर राजीनामा दिला, त्यामुळे दमयंती जाधव यांनी किंद्रे यांच्या सहकार्याने पक्षाविरुध्द बंड करून सभापतिपद मिळविले. दमयंती जाधव व श्रीधर किंद्रे यांना राष्ट्रवादीचे आणखी काही बडे पदाधिकारी सहकार्य करीत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

यापूर्वी आठ नगरसेवकांवर कारवाई 

दरम्यान, पक्षाचा व्हीप न पाळल्यामुळे भोर नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आठ नगरसेवकांना सदस्यत्व गमावावे लागले होते. याची जाणीव असूनही सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे पालन झाले नाही, त्यामुळे पक्षश्रेष्ठी हे कडक कारवाई करणार की या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार हे पाहावे लागेल. 

या नेत्यांना एकत्र कसे ठेवणार? 

राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जिल्हा बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, युवा नेते विक्रम खुटवड, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाठे, माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, विद्यमान तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे यांच्यामध्ये एकसुत्रीपणा ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोणता रामबाण उपाय वापरतात, याकडे तालुक्‍याचे लक्ष आहे. 

Edited By vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख