पुणे : मी स्वतः आजारी असल्याने त्या काळात वीज बिलांबाबत मंत्रीमंडळात काय चर्चा झाली हे माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. काल पुण्यात पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी मेळावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
कोरोना काळातल्या लाॅकडाऊन नंतर राज्यातल्या वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले आली आहेत. त्यावरुन राज्यात असंतोष आहे. भाजप, मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्वाभीमानी शेतकरी संघटना यांनी याबाबत आवाज उठवला आहे. ही वीज बिले भरावीच लागतील. त्यात सवलत मिळणार नाही, असे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केल्यानंतर हा असंतोष अधिकच तीव्र झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी वरीलप्रमाणे विधान केले.
''मी स्वतः कोरोनाने आजारी होतो. काही दिवस रुग्णालयात होतो. तर काही दिवस क्वारंटाईन झालो होतो. नंतर दिवाळीचे चार दिवस बारामतीत मुक्कामाला होतो. त्यामुळे या काळात वीज बिलांबाबत मंत्रीमंडळात काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. मी मुंबईला गेल्यावर मंत्रालयात जाणार आहे. त्यावेळी मी याबाबत माहिती घेईन,'' असे पवार यांनी पुण्यातील पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, राज्याच्या उर्जामंत्र्यांनी वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे वारंवार आश्वासन दिले. परंतु उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे ही सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी नकार दिला. श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करीत आहे. जोपर्यंत राज्यातील जनतेला ३०० युनिट पर्यंतची सवलत व वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे. हा दिलासा न मिळाल्यास मंत्रालयात घुसणार असल्याचाही इशारा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
दुसरीकडे राज्य सरकारने विजेच्या संदर्भातील जो निर्णय घ्यायचा, होता तो घेतला नाही, उलट ज्यांनी बिल भरलं नाही त्यांची वीज कट केली जाईल असं म्हटलं, हे राज्याचं दुर्दैव आहे. महावितरण ५० टक्के तोटा सहन करू शकतो, असा अहवाल देण्यात आला होता, पण ही फाईल राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवली आहे, असा खळबळजनक आरोप वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Edited By- Amit Golwalkar

