पंढरपूर-मंगळवेढ्यातील विजयानंतर राज्यात भाजपचे सरकार येणार  ः दरेकर - After the victory in Pandharpur-Mangalvedha, BJP government will come to the state: Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

पंढरपूर-मंगळवेढ्यातील विजयानंतर राज्यात भाजपचे सरकार येणार  ः दरेकर

हुकूम मुलाणी
बुधवार, 14 एप्रिल 2021

शिवसेनेने बेइमानी करून वेगळ्या विचारधारेच्या लोकांशी युती केल्याने आम्हाला सत्तेपासून दूर जावे लागले. 

मंगळवेढा  ः विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून द्या. मी राज्यातील सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो,’ या वक्तव्यानंतर बुधवारी (ता. १४ एप्रिल) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही मंगळवेढ्यातील मरवडे येथील सभेत त्या वाक्याचा पुनरुच्चार केला.  पंढरपूर-मंगळवेढ्याच्या विजयानंतर राज्यात भाजपचे सरकार येणार आहे, असा दावा दरेकर यांनी केला. एकूणच राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ते मरवडे येथे बोलत होते. या वेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सचिन शिवशरण, सचिन घुले, राजेंद्र पोतदार, दौलत मासाळ, पांडुरंग मासाळ, बापू मेटकरी, रजाक मुजावर आदी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले की विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पवार कुटुंबीय लेकरा बाळासह आलेले आहेत. त्यांचा डोळा निवडणुकीपेक्षा साखर कारखान्यांवर अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापितांना व शिक्षण सम्राटाला मोठे केले आहे. परंतु या निवडणुकीत सरकारच्या विरोधात असलेला रोष पाहून येथील जनता तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याचे काम केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे सरकारने शेतकऱ्यांसाठी काम केल्यानंतर राज्यातील जनतेने सरकारला स्पष्ट बहुमत दिले असताना शिवसेनेने बेइमानी करून वेगळ्या विचारधारेच्या लोकांशी युती केल्याने आम्हाला सत्तेपासून दूर जावे लागले. 

पवारांनी मराठा समाजावर राजकारण केले. पण, मराठा समाजावर आतापर्यंत अन्याय केला. मात्र, देवेंद्र फडणविसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. आपल्याला उज्ज्वल भविष्य हवे असेल, तर आपण समाधान आवताडे यांना विजयी करावे. पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासाची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे. तुम्ही भाजपच्या उमेदवारास निवडून द्या; मंगळवेढ्याच्या विकासाचे चित्र समाधान आवताडे यांच्यासह आम्ही बदलू, त्यासाठी आम्ही निधी देऊ, त्यामुळे ही कार्यकर्त्यांनी ही निवडणूक सहज न घेता गांभीर्याने घ्यावे. कधी कुणाचे नशीब बदलेल ही वेळ सांगून येत नाही. मात्र, पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आवताडे यांना आमदार करण्याची वेळ आली आहे, असेही दरेकर यांनी नमूद केले. 

राज्यामध्ये कुणाच्याही चेहर्‍यावर आनंद नाही. राज्याचे सरकार बिल्डर व दारू विक्रेत्याचे आहे. बिल्डरांना सवलत द्यायला पाच हजार कोटी रुपये आहेत. मात्र, शेतकऱ्यांना सवलत द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकऱ्याची विजेचे कनेक्शन तोडले जात आहे. मंगळवेढा तालुक्यातील 35 गाव पाणी येण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून निधी उपलब्ध करण्यास करण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेत्यांनी दिले आहे, त्यासाठी तुम्हाला इथला आमदार भाजपचा निवडून द्यावा लागेल. समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील पाण्याचा प्रश्नदेखील केंद्र सरकारच्या मदतीतून मार्गी लागेल, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख