After the bandh, Jambalkar also got involved in the crime of social distance of overzealous activists ..! | Sarkarnama

बांदलांनंतर जांभळकरही अडकले अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या सोशल डिस्टंसिंगच्या गुन्ह्यात..! 

भरत पचंगे 
बुधवार, 1 जुलै 2020

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील यांच्याच थेट आदेशाने दाखल झालेला गुन्हा जिल्ह्यातील सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी थेट इशारा ठरला आहे. 

शिक्रापूर : पहिल्यांदाच सभापतीपदाचा मान मिळाल्याचा आनंद करंदी (ता.शिरूर) ग्रामस्थांना व युवा कार्यकर्त्यांना लपविता आला नाही. मात्र त्याचा फटका नवनिर्वाचित सभापती शंकर जांभळकर यांनाच बसला आणि त्यांचेसह सुमारे 25 जणांवर सोशल डिस्टंसिंग न पाळण्याचा व संचारबंदी धुडकावल्याचा गुन्हाही दाखल झाला. 

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील यांच्याच थेट आदेशाने दाखल झालेला गुन्हा जिल्ह्यातील सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी थेट इशारा ठरला आहे. 

शिरुर तालुक्‍याच्या राजकारणात कधीच प्रथम प्राधान्याचे पद न मिळालेल्या करंदी (ता.शिरूर) येथील बाजार समिती संचालक शंकर जांभळकर यांना सोमवारी (दि. 29) सभापतीपदाची माळ गळ्यात पडली. तालुक्‍याच्या राजकारणात, शिरुर-हवेली व आंबेगाव-शिरुर अशा दोन मतदार संघाच्या अहमिकेच्या पार्श्वभूमिवर जांभळकर सभापती होण्यात यशस्वी झाले.

तालुक्‍यातून चांगले स्वागत होवून ते संध्याकाळी आपले गाव करंदी (ता. शिरूर) येथे येताच गावातील युवकांनी एकच जल्लोष करीत गुलालाची उधळण करुन आपला आनंदोत्सव साजरा केला. खरे तर असे कुठलेच कृत्य करायचे नाही अशा स्पष्ट सुचना जांभळकर यांनी दिल्या असतानाही युवकांना आपला उत्साह लपविता आला नाही. 

परिणाम असा झाला की, काढलेली मिरवणूक व केलेला जल्लोष शिक्रापूर पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. पर्यायाने सभापती शंकर जांभळकर, शिवाजी पोतले, राजेंद्र ढोकले, विशाल वर्पे, शरद दरेकर, जावेद इनामदार, संतोष ढोकले, दिलीप ढोकले, राजेंद्र दरेकर, संभाजी खेडकर आदींसह इतर 10 ते 15 म्हणजेच एकुण 25 जणांवर कोरोनासाठी ठेवायचे सोशल डिस्टसिंग व जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली संचारबंदी आदी उल्लंघनाचे गुन्हे दाखल करण्यात आले. 

याबाबत अशोक लहुराव केद्रा यांनी फिर्याद दाखल केली असून या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्रापूर पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली. 

पोलिसांनी दिले प्रतिउत्तर त..! 
शिरुर बाजार समितीची सन 2011 ची सभापती निवडणूक गाजविलेले माजी सभापती मंगलदास बांदल यांनी लॉकडाऊन काळात अशाच पद्धतीने शेतात मित्रमंडळी एकत्र करुन कराओके गाण्यांचा कार्यक्रम केला होता. हा कार्यक्रम सोशल मिडीयात चांगलाच व्हायरल झाल्याने शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत बांदलांसह इतर चौघांवर वरील कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. 

अर्थात राजकीय व्यक्तींनी खरे तर कोरोना काळात दक्षता घेऊन स्वत:ला आवर घालायला हवा असाच जिल्हा पोलिसांचा उद्देश होता. तरीही करंदीकरांकडून असे गैरवर्तन होतेय म्हणून या प्रकरणी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, गोपनियचे पोलिस नाईक ब्रह्मा पवार यांनी स्वत: येवून खातरजमा करुन वरील फिर्याद दाखल करुन गुन्हे दाखल केले आहेत. 

अर्थात गावाला सभापतीपद मिळाल्याने बेभान करंदीकरांच्या पहिल्या कृतीला पोलिसांनी कारवाईने प्रतिउत्तर दिल्याने ही कारवाईही तालुक्‍यात आज चांगलीच चर्चेत राहिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख