Yogesh Tillekar as State President of BJP OBC Front | Sarkarnama

योगेश टिळेकरांवर फडणवीसांचा विश्‍वास; ओबीसी आघाडीची दिली जबाबदारी

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 3 जुलै 2020

भारतीय जनता पक्षाने हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. टिळेकर यापूर्वी पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. 

पुणे : भारतीय जनता पक्षाने हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. टिळेकर यापूर्वी पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरीही पक्षाने त्यांच्यावर संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाचे पुण्यातील दुसरे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडेदेखील चार महिन्यांपूर्वी पुण्याच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची यादी पाहिली तर नव्या फळीतील तरुण चेहऱ्यांना पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी देण्याचे पक्षाचे धोरण दिसत आहे. 

मुळीक व टिळेकर हे दोघेही माजी आमदार आहेत. सन 2014 च्या निवडणुकीत हे दोघेही पहिल्यांदा आमदार झाले. मात्र, 2019 च्या निवडणुकीत दोघांनाही पराभव पत्करावा लागला. पराभवानंतरही या दोघांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या आहेत. टिळेकर हे ओबीसी समाजातील आहेत. त्यांचे वय चाळीसच्या आसपास आहे. राज्यात पक्षाच्या ओबीसी आघाडीला नवा चेहरा देताना पक्षाने मुत्सद्दीपणा दाखवला आहे. या दोघांवरही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष प्रेम असल्याचे या निवडीमुळे दिसून आले आहे. 

फडणवीस यांच्या नेतृत्वाची एक नवी फळी पक्ष संघटनेत गेल्या पाच वर्षांत तयार करण्यात आली आहे. नव्या नेमणुका या त्याचाच भाग आहे. टिळेकर यानी पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक, तसेच दोन वेळा आमदारकीची निवडणूक लढविली आहे. ओबीसी समाजातील असले तरी खुल्या गटातून ते नगरसेवक झालेले होते. 

आमदार असताना त्यांच्याकडे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले होते. आता त्यापेक्षा महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. या माध्यमातून राज्यभर ओबीसी समाजाचे नेटवर्क उभे करण्याची संधी त्यांना आहे. 

या संदर्भात बोलताना योगेश टिळेकर म्हणाले,"पक्षाने मोठ्या विश्‍वासाने माझ्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी अधिक चांगल्या क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पक्षाची ओबीसी आघाडी राज्यात सक्षम आहे. ही संघटना आणखी मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहील. युवा मार्चाचे काम करताना राज्यभर फिरल्याचा फायदा मला या कामासाठी नक्की होईल.' 

आणखी दोन वर्षांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांची तयारी करण्यासाठी पक्षाच्या या तरुण नेतृत्वाचा फायदा पक्षाला होईल. येत्या दोन वर्षांत पक्षाचे ग्रामीण भागातील संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न संघटनेकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी ओबीसी आघाडीसह इतर सर्व सेलचा पक्षाला खरोखरच किती फायदा होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख