आता मृतदेहांच्या दागिन्यांचीही होतेय चोरी; कोरोना सेंटरमधील धक्कादायक प्रकार  - Womens jewelry is being stolen at the Corona Center in pimpri | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

आता मृतदेहांच्या दागिन्यांचीही होतेय चोरी; कोरोना सेंटरमधील धक्कादायक प्रकार 

उत्तम कुटे
मंगळवार, 4 मे 2021

मोफत असलेल्या या कोरोना सेंटरमध्ये महिलेला दाखल करून घेण्यासाठी तिच्या नातेवाईकाकडून एक लाख रुपये घेण्यात आले होते.

पिंपरी : कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आर्थिक लुटीनंतर आता कोरोना मृतांच्याही दागिन्यांची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडला घडला आहे. महापालिकेच्या ऑटो क्लस्टर कोरोना सेंटरमध्ये नुकतीच ही घटना घडली. तेथे मरण पावलेल्या महिला रुग्णाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या मृतदेह ताब्यात देताना या महिलेच्या हाताच्या बोटात नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

मोफत असलेल्या या कोरोना सेंटरमध्ये महिलेला दाखल करून घेण्यासाठी तिच्या नातेवाईकाकडून एक लाख रुपये घेण्यात आले होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सुरु केलेल्या तपासात ही गंभीर  बाब उजेडात आली. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या तिन्ही डॉक्टरांना ता. ६ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश काल न्यायालयाने  दिला, अशी माहिती तपासाधिकारी महेश स्वामी यांनी दिली. या तिघांनी वरीलप्रकारे आणखी काही कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून मोफत कोरोना सेंटरमध्ये बेड देण्यासाठी पैसे उकळल्याचा पोलिसांचा संशय आहे.

कोरोना सेंटर चालविण्यास घेतलेल्या फॉर्च्यून स्पर्श हेल्थकेअर प्रा. लि.चा सल्लागार डॉक्टर डॉ. प्रवीण शांतवन जाधव (वय ३५, रा. थेरगाव) व पद्मजा या खासगी रुग्णालयातील डॉ. शशांक भरत राळे (वय ३५, रा.मोशी) आणि डॉ. सचिन श्रीरंग कसबे (वय ३७, रा.चिंचवड) अशी या संशयित आरोपी डॉक्टरांची नावे आहेत. 

याच कोरोना सेंटरमध्ये दाखल झालेल्या दुसऱ्या एका महिलेचे मंगळसूत्र याअगोदर चोरीला गेले आहे. भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे त्याबाबत तक्रार केलेली आहे. त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाल्याने हे कोरोना सेंटर आणि ते चालविणाऱ्या ठेकेदार संस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. याच संस्थेने भोसरीतील दोन कोरोना सेंटरमध्ये एकाही रुग्णावर उपचार न करता पालिकेकडून दोन कोटी १७ लाख उकळलेले आहेत. 

याठिकाणी २३ तारखेला एक लाख रुपये घेऊन पालिका शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या सुरेखा वाबळे (वय ५४,रा. चिखली) यांना आय़सीयू बेड़ देण्यात आला होता. मात्र, त्यांचे २८ तारखेला निधन झाले. त्यांना येथे दाखल करण्यासाठी एक लाख रुपये घेण्यात आल्याचे ३० तारखेला उघडकीस आल्यानंतर मोठा गदारोळ झाला. त्यामुळे पालिका आय़ुक्तांनी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाशांकडे १ तारखेला तक्रार दिली. त्यावर त्याच दिवशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तक्रारीत नाव असलेल्या वरील तिन्ही डॉक्टरांना अटक केली. त्यातील राळे व कसबे फरार होण्याच्या बेतात होते. 

या गुन्ह्याच्या तपासात वाबळेंचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यावेळी त्यांच्या दोन बोटांत असलेल्या सोन्याच्या अंगठ्या गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यादृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरु केल्याने हे सेंटर चालविण्यास घेतलेल्या ठेकेदाराच्या अडचणी वाढल्या आहेत.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख