उमेदवारीसाठी निधी गोळा करणारा शिवसेनेचा तो नेता कोण? - Who is the leader of Shiv Sena who is raising funds for candidature? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

उमेदवारीसाठी निधी गोळा करणारा शिवसेनेचा तो नेता कोण?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

दबक्‍या आवाज या नेत्याचे कारनामे पक्षातील शिवसैनिकांकडून खासगीत सांगितले जात आहे.

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी देऊ, असे आश्‍वासन देऊन पक्षातील एका नेत्याने काही इच्छुकांकडून निधी गोळा केला असल्याची जोरदार चर्चा पुणे शहर शिवसेनेत आहे. तो नेता राज्यातील आणि केंद्रातील एका वरिष्ठ नेत्याच्या अत्यंत जवळचा असल्यामुळे यावर उघड बोलण्यास कोणीही तयार नाही. परंतु त्यातून पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. दबक्‍या आवाज या नेत्याचे कारनामे पक्षातील शिवसैनिकांकडून खासगीत सांगितले जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीची तयारी घेण्यासाठी पक्षाचे नेते रवींद्र मिर्लेकर यांनी पुणे शहर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि नेत्यांची रविवारी बैठक घेतली. या वेळी बाहेरून आलेल्यांना देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरून मिर्लेकर यांना शिवसैनिकांनी रोखठोक भाषेत सुनावले. त्या वेळी असे काही होणार नाही म्हणत मिर्लेकर यांनी वेळ मारून नेली.

‘‘कार्यक्रम आम्ही घ्यायचे आणि निवडणुका जवळ आल्या की बाहेरून आलेल्यांना उमेदवारी द्यावची. मग ते सपाटून पडतात, त्यामुळेच सांगा आता आम्ही काम करावयाचे की नाही,' असा रोखठोक सवाल शिवसैनिकांनी मिर्लेकर यांना विचारला. त्यावर ‘‘आता असे काही होणार नाही, जो चांगले काम करेल, त्याला शंभर टक्के उमेदवारी मिळेल,’’ असे सांगून वेळ मारून नेण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यापासून ते नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यापर्यंतच्या अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. मिर्लेकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकच्या दोन दिवस अधी संपर्क प्रमुख बाळा कदम यांनी पुण्यात येऊन एक स्वतंत्र बैठक घेतली होती. परंतु मिर्लेकर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत शिवसैनिकांनी रोखठोक सवाल केल्याने महापालिका निवडणुकीच्या वेळेस पक्षाच्या नेत्यांकडून कशाप्रकारे उमेदवारी वाटप केले जाते, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

शिवसैनिकांनी रोखठोकपणे केलेल्या सवालावर मिर्लेकर म्हणाले," असे आता होणार नाही. जो चांगले काम करेल, त्याला शंभर टक्के उमेदवारी दिली जाईल. त्यासाठी शहरातील पक्षाच्या नेत्यांशी मी स्वत: बोलणार आहे.' असे आश्‍वासन देत वेळ मारून नेली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख