Went with MLAs for inauguration and brought positive report! | Sarkarnama

आमदारांसोबत उद्‌घाटनासाठी गेले आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन आले! 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 14 जुलै 2020

कोरोनाच्या काळात ठेवण्यात आलेला जनसंपर्क लक्षात घेऊन आमदार महोदयांनी स्वतः आणि काही कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. केवळ अर्ध्या तासात चाचणीचा अहवाल आला. मात्र, तो पाहून सर्वजण चक्रावले. कारण, चार कार्यकर्त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सुदैवाने, आमदार साहेबांचा अहवाला मात्र निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेने रॅपिड टेस्ट सुरू केल्या आहेत. पुण्यातील एका आमदाराच्या उपस्थितीत एका टेस्ट सेंटरचे उद्‌घाटन करण्यात आले.

कोरोनाच्या काळात ठेवण्यात आलेला जनसंपर्क लक्षात घेऊन आमदार महोदयांनी स्वतः आणि काही कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. केवळ अर्ध्या तासात चाचणीचा अहवाल आला. मात्र, तो पाहून सर्वजण चक्रावले. कारण, चार कार्यकर्त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सुदैवाने, आमदार साहेबांचा अहवाला मात्र निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

पुण्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महापालिकेने कोरोना केअर सेंटर आणि स्वॅब कलेक्‍शन सेंटर येथे रॅपिड टेस्ट सुरू केल्या आहेत. त्यासाठी आरसीएमआरची मान्यता असलेल्या कंपनीकडून महापालिका प्रशासानाने एक लाख किट खरेदी केल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण लवकर शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार करता यावेत. यासोबतच शहरातील मृत्यदर कमी करता येईल, असा या रॅपिड टेस्ट सुरू करण्यामागचा हेतू आहे. 

शहरातील एका आमदाराच्या कार्यक्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड टेस्टचे कीट उपलब्ध झाले. ही माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना कळवली. रॅपिड टेस्टचे उद्‌घाटन आमदारांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविण्यात आले.

आमदार साहेब संबंधित केंद्रात आले. आमदार साहेबांच्या सोबत दुसऱ्या एका चारचाकीतून सात ते आठ कार्यकर्तेही आले होते. रॅपिड टेस्ट, त्याचा अहवाल किती वेळात मिळतो, याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी दिलेल्या भेटी, दररोजचा जनसंपर्क लक्षात घेऊन आमदार साहेबांनी स्वतःची चाचणी करण्याचे ठरविले. त्यानंतर आमदारांनी कार्यकर्त्यांनाही चाचण्या करून घेण्याचे फर्मावले. 

आम्ही फीट असून आम्हाला काहीही त्रास नाही, असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदारांच्या आदेशामुळे चाचणी करावी लागली. ठरलेल्या वेळेनुसार म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात रिपोर्ट आला. त्यात तपासणी करण्यात आलेल्या सहा कार्यकर्त्यांपैकी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आमदारांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला होता. संबंधित कार्यकर्त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यांच्या घरच्यानाही त्याबाबतची माहिती देऊन त्यांचीही चाचणी करण्यात आली. 

काही व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. अशा व्यक्ती वाहक असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसल्यास किंवा कोरोना रुग्णाशी संपर्क आल्यास न घाबरता तत्काळ चाचणी करून घेण्याचे आवाहन संबंधित आमदार साहेबांनी केले आहे. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख