शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वीजबील थकबाकीमध्ये मिळणार माफी... - Waiver of electricity bill arrears for farmers in maharashtra state | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वीजबील थकबाकीमध्ये मिळणार माफी...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वीजबील थकबाकीमध्ये माफी दिली जाणार आहे. त्यानुसार महावितरणच्या पुणे परिमंडलातील कृषिपंपधारकांसह 1 लाख 25 हजार 192 कृषी वीजग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे.

पुणे : कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वीजबील थकबाकीमध्ये माफी दिली जाणार आहे. त्यानुसार महावितरणच्या पुणे परिमंडलातील कृषिपंपधारकांसह 1 लाख 25 हजार 192 कृषी वीजग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. थकबाकीपैकी निर्लेखन, व्याज व दंड माफीचे एकूण 144 कोटी 9 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. उर्वरित मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीही माफ केली जाणार आहे. 

पुणे परिमंडलात  पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ, व खेड तालुक्यांमध्ये 1 लाख 25 हजार 192 कृषी ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे व्याज व विलंब आकारासह सद्यस्थितीत 921 कोटी 89 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. कृषिपंप वीजजोडणी धोरणामध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांचा समावेश आहे. 

या ग्राहकांच्या 5 वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर 2015 पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार 100 टक्के माफ करून व्याज 18 टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे.

नव्या धोरणाप्रमाणे या कृषी ग्राहकांकडे आता 777 कोटी 81 लाख रुपयांची मूळ थकबाकी उरली आहे. योजनेनुसार या सर्व कृषी ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येणार आहे. वीजबिलांबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास त्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी संबंधीत कार्यालयांना दिल्या आहेत.

अशी पहा थकबाकी व माफी...

विशेष म्हणजे कृषी ग्राहकांना संबंधीत वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम आदींचा तपशील महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे. केवळ ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर योजनेतील संबंधीत बिलाचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख